राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठेही क्लीनचीट दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

जे कोणी पवारांनी क्लीनचीट दिली असे सांगत आहेत, त्यांनी ती मुलाखत नीट पाहिलेली नाही किंवा ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांनी तीन गोष्टी सांगितल्या त्याकडे दुर्लक्ष केले जातेय.

विमानांच्या किंमती का वाढल्या ? ते सरकारने स्पष्ट करावे. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच भाजपाच्या दुटप्पीपणावर त्यांनी टीका केली होती. भाजपाने बोफोर्सच्यावेळी जेपीसीची मागणी केली आणि आता राफेलच्यावेळी ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत असे पवार म्हणाले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जातेय असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याने वाईट वाटले. ते २० वर्षांपासून पक्षासोबत होते. त्यांनी शरद पवारांना एकदा फोन करुन चर्चा करायला हवी होती असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सरचिटणीस तारिक अन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी अचानक राजीनामा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.