राज्यात परतीच्या पावसानं प्रचंड हाहाकार उडवला. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक शेतमाल पुरात वाहून गेला, तर शेतात उभी असलेली पिकं सडून गेली. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांनी सकाळी तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी शरद पवार दौरा करत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरपासून केली.

तुळजापूरपासून गाडीतून काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत पवार पुढे रवाना झाले. यावेळी कांकाब्रा ते सास्तुरा गावांच्या दरम्यान शरद पवार यांनी गाडी थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. अनेक शेतकरी हातात भिजलेली पिकं घेऊन त्यांना दाखवत होती.

शरद पवार दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार असून, यादरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. १९ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.