02 December 2020

News Flash

शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्याची खेळी

अतिवृष्टीचा कहर, तोकडय़ा मदतीमुळे शेतक ऱ्यांमध्ये सरकारबद्दल असलेली नाराजी आणि स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा उठू लागलेला आवाज या पाश्र्वभूमीवर

| September 7, 2013 01:30 am

अतिवृष्टीचा कहर, तोकडय़ा मदतीमुळे शेतक ऱ्यांमध्ये सरकारबद्दल असलेली नाराजी आणि स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा उठू लागलेला आवाज या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विदर्भ दौरे जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतक ऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल, अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता पूरग्रस्त विदर्भाच्या स्वतंत्र दौऱ्यावर आलेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पहिल्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. हा दौरा फक्त एकाच दिवसात आणि अत्यंत घाईघाईत पार पडला. यात मुख्यमंत्र्यांवरच साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्यामुळे केंद्रातील कृषी खात्याची जबाबदारी असलेल्या शरद पवारांनी विदर्भातील शेतक ऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे कुठलेही चित्र निर्माण होऊ नये, यासाठी पवारांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शरद पवार १४ ते १६ सप्टेंबर या काळात तीन दिवस विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्य़ांमध्ये फिरणार आहेत. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चंद्रपूरला पवारांच्या दौऱ्यातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन दिवसांत ११ जिल्हे फिरणे शक्य नसल्याने सहा जिल्ह्य़ांचीच निवड करून पवारांचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी अतिरिक्त मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु, केंद्रीय समितीचा दौरा अद्याप झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी केंद्राच्या मदतीची शक्यता दृष्टिपथात नाही.
आता स्वत: कृषिमंत्रीच दौऱ्यावर येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आत्महत्यासत्राने पुन्हा उचल खाल्ल्याने शेतकरी नेते आता केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करीत आहेत. निवडणुकांचा येणारा काळ पाहता शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेण्याची राष्ट्रवादीची तयारी नाही. त्यामुळे पवारांचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार आहे.
शरद पवार यांचा दौरा आटोपल्यानंतर २१ सप्टेंबपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही विदर्भात तीन दिवस राहणार असल्याने काँग्रेसमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी किंवा पूरग्रस्तांना भेटण्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याचे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संघटना बळकटी आणि केंद्राच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अंमलबजावणीची यंत्रणा सक्षम करणे यावर राहुल गांधींचा भर राहणार असून स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी या मुद्दय़ावर फक्त चर्चा आणि बैठका होणार असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:30 am

Web Title: sharad pawar organized tour at vidarbha move to seek votes of farmers
Next Stories
1 जादूटोण्याला लगाम: नाशिकमध्ये नरबळीच्या प्रयत्नातील दोघांना अटक
2 बैलपोळ्याच्या आनंदाला गालबोट
3 उत्पादक, संघटनांनीच उसाचा पहिला हप्ता ठरवावा : मुख्यमंत्री
Just Now!
X