भाजपमध्ये परस्परविरोधी दावे

कोपर्डी घटनेच्या पाश्र्वभूमीवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलण्याच्या मागणीसाठी राज्यात संपूर्ण शक्तिनिशी निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या मागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याबद्दल सत्ताधारी भाजपमध्ये वैचारिक गोंधळ दिसून येतो. खासदार अमर साबळे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा मोर्चामागे शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप केला होता. परंतु पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या मोर्चामागे शरद पवार हे नाहीत, असा निर्वाळा दिला आहे.

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यातूनच समाजातील अस्वस्थता बाहेर पडू लागली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व परभणी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने अभूतपूर्व मोर्चे काढण्यात आले आहेत. येत्या २१ सप्टेंबर रोजी सोलापुरातही मराठा समाजाचा सुमारे अकरा लाखांचा मोर्चा काढण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. एकंदरीत, मराठा समाजाचे निघणारे हे मोर्चे राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे या मोर्चाच्या माध्यमातून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे या सर्व घडामोडींमागे शरद पवार यांचा हात असल्याची शक्यता उघडपणे व्यक्त होत आहे.

या पाश्र्वभूमीवर भाजपमधूनही खासदार अमर साबळे यांच्या माध्यमातून पवार यांच्या विरोधात टीकेचा सूर काढला जात आहे. त्यांचे वक्तव्य प्रसिध्द झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या भाजपच्या नेते मंडळींमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येते. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र मराठा समाजाच्या मोर्चामागे शरद पवार यांचा हात असू शकत नाही, असा स्वच्छ निर्वाळा दिला आहे. खासदार अमर साबळे व प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा सूर वेगवेगळा राहिल्यामुळे या प्रश्नावर भाजपमध्ये गोंधळ दिसून येतो, अशी चर्चा होऊ लागली आहे.