निसर्ग वादळामुळे कोकणातील अनेक भागात दाणादाण उडाली असून, शरद पवार यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवस दौरा केला. शरद पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणचा दौरा करणार आहेत. फडणवीसांच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून पवारांनी त्यांना चिमटा काढला. “ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असं पवार म्हणाले.

निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आज (१० जून) रत्नागिरीला भेट दिली. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. दौऱ्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्याविषयी बोलताना पवार म्हणाले,”मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,” असं पवार म्हणाले.

फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर…

देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. त्यातनंतर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.