संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेल लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या टायरखाली लिंबू ठेवल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अजूनही यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केले आहे. संरक्षण मंत्र्यांच्या या कृतीवर आपल्याकडे बोलायला शब्दचं नाहीत, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.

शरद पवार म्हणाले, “सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी राफेल विकत घेण्याच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही शंका नाही. पण मी वाचलं आहे, ते खरं आहे की नाही मला माहिती नाही परंतू, नव्याने खरेदी केलेल्या ट्रकवर नजर लागू नये म्हणून लिंबू-मिरची लटकवल्याप्रमाणे राफेल लढाऊ विमानाबाबतही असे केले जात असेल तर आपण काय बोलणार”

भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. या ३६ विमानांच्या ताफ्यातील पहिले राफेल विमान फ्रान्सने दसऱ्याच्या दिवशी भारताकडे सुपूर्द केले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये शस्त्रपूजा करीत या विमानाची पूजा केली तसेच त्याच्यावर कुंकवाने ओम चिन्ह उमटवले. विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबूही ठेवले. त्यांच्या या कृतीचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली.

आणखी वाचा- मी गाडी घेतली की, लिंबाचं सरबत करून पाजतो; ओवेसींनी डागली तोफ

राफेलला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवणे हे जरा अतीच असून हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवस सोशल मीडियात या लिंबू प्रकरणावरुन बरीच खळबळ सुरु आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली.