राज्यात करोना आणि लॉकडाउनबरोबर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून बरंच वादळ उठलं होतं. राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.
निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर बुधवारी शरद पवारांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी पवार यांनी संवाद साधला. “नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी,” असं पवार म्हणाले.
यावेळी राज्यात सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षांवरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले,”पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनानं घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे होत असं नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते,” असा टोला शरद पवार यांनी उत्तर देताना लगावला.
कोकणवासीयांना दिला दिलासा
“आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७ – ८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी,” असं शरद पवार म्हणाले. “बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे. त्या बागायती जमीनी साफ करायची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्याच याबद्दलची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. यामध्ये गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी करू, यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील. निसर्ग चक्रीवादळाने सगळ्या भागात नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचा विचार केला जाईल,” असा विश्वासही शरद पवार यांनी कोकणवासीयांना दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 6:43 pm