निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मालमत्तांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालं. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसीय दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही एक अपेक्षा व्यक्त केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांना शरद पवार यांनी मंगळवारी भेट दिली. नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. त्याचबरोबर श्रीवर्धन येथे आढावा बैठकही घेतली. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले,”रायगड भागात ७५४ करोना रूग्ण आढळले असून, करोनामुळे २९ जणांनी जीव गमावला आहे. या परिस्थितीत अनेकांवर आर्थिक बोजाही वाढलेला आहे. लोकांमध्ये करोनाबाबत जागृती कशी करता येईल, यावर भर दिला असतानाच हे निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. या भागात मुख्यत्वे मत्स्य उत्पादन तसेच भात व फळबाग शेती केली जाते. चक्रीवादळात नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. दुष्काळात एक पीक जाते. पण नारळाची बाग उध्वस्त झाली, तर पुन्हा उभी करण्यासाठी पुढील ८-१० वर्षे लागतात. याचा विपरीत परिणाम येथील शेतकऱ्यांवर होऊ शकतो,” अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली.
“आता या भागातील जमीन पूर्ववत करण्यासाठी काय करावे हा प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वी जालना आणि काही भागात मोसंबी पिकांचे नुकसान झाले असता तेथील फळ बागायतदारांना केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळवून देण्यात आली होती. या भागात देखील असा प्रयत्न करता येईल का याचा निश्चितच विचार करू. लातूरमधील किल्लारीसारखी योजना या भागात करण्यासाठी काही अडचणी आहेत. इथे जमीन कमी आहे. इथली घरे दुरुस्त करण्यासाठी, लोकांना अधिवास निर्माण करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना थेट मदत कशी देता येईल, यावर भर देण्यात येईल.
अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी प. बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल दुमत नाही. त्याठिकाणी १८ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे.आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान @narendramodi यांनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा. pic.twitter.com/p9zqklSCR9
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2020
अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी प. बंगालला केंद्राने जे पॅकेज दिलं त्याबद्दल दुमत नाही. त्याठिकाणी १८ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे.आमचे म्हणणे इतकेच आहे की आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा,” अशी इच्छा पवार यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 3:30 pm