News Flash

शरद पवार, संजय राऊतांनी केलं सुखबीर सिंह बादलांच्या निर्णयाचं स्वागत, म्हणाले…

शेतकऱ्यांना पाठिंबा देत सोडली भाजपाची साथ

केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या पंजाबच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. मोदी सरकारनं तिन्ही विधेयकं संसदेत मांडल्यानंतर शिरोमणी दलानं आपली भूमिका स्पष्ट करत तडकाफडकी निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपाची साथ सोडण्याचाही निर्णय अकाली दलानं घेतला.

भाजपाचा जुना मित्र आणि एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय शनिवारी घेतला. मोदी सरकारनं तीन कृषी विधेयकं संसदेत मांडल्यानंतर अचानक शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. शिरोमणी अकाली दल मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडत असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ एनडीएतून बाहेर पडण्याचाही निर्णय शिरोमणी अकाली दलानं घेतला असून, महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांचं निर्णयाबद्दल अभिनंदन केलं. ‘कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!,’ असं शरद पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

“शेतकऱ्यांच्या हितासाठी एनडीएशी असलेले संबंध तोडण्याच्या अकाली दलाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते,” असं ट्विट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिरोमणी अकाली दलानं शनिवारी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागील २२ वर्षांपासून हा पक्ष एनडीए व भाजपासोबत होता. मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना देशभरातून विरोध होत असल्यानं अकाली दलानं शेतकऱ्यांना पाठिंबा देत हा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 9:40 pm

Web Title: sharad pawar sanjay raut sukhbir singh badal sad farmer bill agriculture bills bmh 90
Next Stories
1 Coronaupdate: राज्यातील रुग्णसंख्या १३ लाखांच्या पुढे, ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू
2 थोडक्यात काय तर ‘आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय’ अशी अवस्था -रोहित पवार
3 फडणवीस-राऊत बैठकीनंतर शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
Just Now!
X