राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत पवारांनी बाळासाहेब आणि उद्धव यांच्यांसंदर्भातील विषयावर मनमोकळेपणे गप्पा मारल्या.

“बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये फरक आहे. बाळासाहेब हे तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे व्हायचे”, असं राऊत यांनी म्हटल्यानंतर, “बाळासाहेब आणि उद्धव यांच्यामध्ये हा फरक आहे. बाळासाहेब हे सत्तेच्या पाठीमागचा एक महत्वाचा घटक होते. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सत्ता चालली हे महाराष्ट्राने आणि देशाने बघितली. आज सत्ता विचारांनी चालली नाही आज प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सत्ता चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे हा मोठा फरक दोघांमध्ये आहेच,” असं पवारांनी एका प्रश्नला उत्तर देताना म्हटलं.

नक्की वाचा >> …तर भाजपाला महाराष्ट्रात १०५ ऐवजी ४०-५० जागाच मिळाल्या असत्या : शरद पवार

देशातील काही राज्यांनी ज्याप्रमाणे अर्थचक्र सुरु करण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला तसचं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातही लॉकडाउनमध्ये मूभा देण्याची गरज अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गरजेची असल्याचे मत पवारांनी मांडले. “देशाची समाजाची आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम पुढील काही पिढ्यांना सहन करावे लागतील. दिल्लीमध्ये, कर्नाटकमध्ये नियम शिथिल केले त्याचे काही परिणाम झाले पण अर्थव्यवस्था आणि व्यवहार सुरु झाले तिथले. अर्थव्यवस्था पुन्हा सवरता कशी येईल यासंदर्भात काळजी घेऊन निर्णय घेणं आणि तेवढ्यापुरती मोकळीक देणं गरजेच आहे. याचा अर्थ सगळं खुल ंकरा असं नव्हते. मात्र थोडी तरी मोकळीक आता हळूहळू द्यायला हवी,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> ‘या’ कारणासाठी लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली : शरद पवार

याच वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सलून सुरु करण्यासंदर्भातील निर्णयाचे उदाहरण दिलं. “मुख्यमंत्र्यांनी सलून सुरु करण्याचा निर्णय घेतला. हे आवश्यक होतं. लोकांच्या समस्यांबरोबरच या व्यवसायात असणाऱ्या लोकांच्या कौटुंबिक समस्या वाढू लागल्या होत्या. त्यामुळे सलून सुरु करण्याच निर्णय योग्य असल्याचं माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार निर्णय ते घेतात. मात्र अंत्यंत सावकाश, काळजी घेऊन, हळूहळू, निर्यणाचे दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करुन मगच ते निर्णय घेतात,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.

या मुलाखतीमध्ये लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते अशा बातम्यांबद्दलच्या प्रश्नावरुन पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत. अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत. आणि या अ‍ॅक्टीव्ही थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झालं. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही.  पण त्यात सत्य नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.