लक्ष्मण माने कार्याध्यक्ष असलेल्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असल्याने मानेंवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबाबत पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी. या प्रकरणातील दलित महिलांच्या आम्ही पूर्णपणे पाठीशी असून माने दोषी असतील तर त्यांची धिंड काढू, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज पत्रकारांशी बोलताना येथे केली.
गायकवाड म्हणाले, की ही संस्था पवारांच्या नेतृत्वाखाली काम करते. अशावेळी त्यांच्याच संस्थेच्या कार्याध्यक्षांविरुद्ध एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊनही त्यांनी याबाबत आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. पवारांनी व या जिल्ह्य़ाचे रहिवासी असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने ती जाहीर करावी आणि तपासाचे आदेश द्यावेत. दलित महिलांवर अत्याचार झालेले असतील तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
ते पुढे म्हणाले,‘‘मानेंविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल होऊन दहा दिवस उलटून गेले तरी माने पोलिसांना मिळत नाहीत. यामुळे त्यांच्याबाबत संशय निर्माण होत आहे. यासाठी माने यांनी सर्वप्रथम समाज आणि पोलिसांसमोर येऊन आपली बाजू मांडावी.’’
दरम्यान, या वेळी संस्थेतील माने यांच्या कार्यपद्धतीवरही काही नेत्यांनी टीका केली. कर्मचाऱ्यांना कमी पगार देणे, कामावरून काढून टाकणे, खोटय़ा तक्रारी दाखल करणे आदी तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत असल्याचे या नेत्यांनी सांगितले.