प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

नाशिक : मराठा आरक्षणाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनादुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली असली तरी घटनादुरुस्ती नेमकी कशी करावी, हे त्यांनी मांडल्यास त्यावर चर्चा होऊ शकेल, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पवार यांनी हे स्पष्ट न केल्यास केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी केलेले विधान, एवढाच त्याचा अर्थ राहील, असेही त्यांनी सांगितले.

भारिप बहुजन महासंघाच्या संवाद यात्रेनिमित्त रविवारी येथे आलेल्या अ‍ॅड्. आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाविषयी गंभीरपणे चर्चा करण्याऐवजी भूलथापा देणारी तसेच सवंग लोकप्रियतेची विधाने राज्य सरकारकडून केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाविषयी विरोधी पक्षासारखे वर्तन करून भूलथापा देत वेळ मारून नेण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार असले तरी अधिवेशनाशिवायही आरक्षण देणे शक्य आहे, परंतु भाजप कृती करत नसल्याची टीका अ‍ॅड्. आंबेडकर यांनी केली.  राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे सांगून त्यांनी ठाकरे यांच्या सर्वाना आर्थिक निकषावर आरक्षण असावे, या विधानाची खिल्ली उडवली. घटनेतील तरतुदींनुसार सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच कोणत्याही समाजाला आरक्षण देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वंचितांची आघाडी उभी करण्यामागे सामाजिक आणि लोकशाहीचे समाजीकरण हा महत्त्वाचा उद्देश आहे. लोकशाहीचे समाजीकरण झाल्यावरच विकास होऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष घराणेशाही, तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धर्मवादी संघटनांना पोसत आहेत, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.