केंद्रीय मंत्री आणि रिपाई (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं. रामदास आठवले यांनी याप्रकरणावर बोलत असताना, शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याची विनंती केली आहे.

जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये.

आणखी वाचा- …तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल; फडणवीसांना काँग्रेसचा सल्ला

काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. दरम्यान, राऊत-फडणवीस भेटीनंतर राज्यांत चर्चांना उधाण आलं असलं तरीही महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्यातील विरोधामुळेच पडेल, आम्हाला यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.