चिक्की खरेदी प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांबद्दल ‘छोटय़ा छोटय़ा विषयांवर मी काय बोलणार’ अशी ‘बोलकी’ प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. मात्र, याविषयी कोणतेही उघड वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ आमदार राज पुरोहित यांच्या कथित वक्तव्यामधून समोर आलेल्या वक्तव्यांमुळे ‘भारतीय जनता पक्षामधील खदखद बाहेर आली आहे,’ असेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्तेवर आल्यानंतर इतक्या कमी कालावधीत त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांबद्दल अशी जाहीर चर्चा सुरू होईल, असे वाटले नव्हते. केंद्र व राज्यातील तीन-चार महिला नेत्यांविषयी माध्यमांमध्ये जे काही चित्र समोर आले आहे, ते काळजी करण्यासारखे आहे. अर्थात, केंद्रात सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. त्याची चिंता नाही. मात्र, राज्यात काय होईल ते सांगता येत नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.
छगन भुजबळ यांच्याविषयी प्रथमच जाहीर वक्तव्य करताना भुजबळ यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टिप्पणीही पवार यांनी या वेळी केली.
पंकजा मुंडे यांच्या चिक्की प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले असतानाच खुद्द पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी मात्र या प्रकरणावर छोटय़ा विषयावर मी काय बोलणार असे मार्मिक उत्तर दिले .
राज पुरोहित यांच्यासारखा  त्यांचा ज्येष्ठ सहकारी  मते मांडत आहे. त्यांच्या अन्य सहकाऱ्यांमध्येही हीच भावना आहे, असा टोला पवार यांनी लगावला.