News Flash

“मला वाटत ते रात्री कपडे घालूनच तयार असतात”; पाटलांच्या प्रश्नावर पवारांचा ‘फ्री हिट’

शरद पवारांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशांध्यक्षांना काढला चिमटा

प्रतिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय (डावीकडील फोटो) आणि पवन खांगरे (उजवीकडील फोटो))

महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य करणारे  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलीच फिरकी घेतली. पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन पवारांना पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सरकार स्थिर असल्याचे सांगतानाच पवारांनी खास त्यांच्या शैलीत पाटलांना टोला लगावला.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार लवकरच जाईल अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना पवारांनी, “त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, आताचे सहा महिने गेले आहेत. आणखीन साडेचार वर्षे त्यांना वाट पहावी लागेल,” असं उत्तर देत राज्यातील सरकार स्थिर असल्याचे संकेत दिले. मात्र पुढे बोलताना त्यांनी, “मला वाटत ते (भाजपाचे नेते) रात्री कपडे घालूनच तयार असतात” असा खास शैलीतील टोलाही लगावला.

वाचा >> “आजपर्यंत देशातील जनतेने कधीही…”; हाथरस प्रकरणावरुन शरद पवारांनी योगी सरकारला सुनावलं

पाटील नक्की काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं २८ सप्टेंबर रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. “पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं होतं.

भाजपा अजूनही सत्तेचं स्वप्न पाहतं आहे

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपा सत्तेचं स्वप्न अजूनही पाहतं आहे असं उत्तर दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे  जे नेते भाजपात गेले होते ते आता परत आमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. त्यांना थोपवण्यासाठी भाजपाकडून असे दावे केले जात आहे. तिन्ही पक्षांमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि तिन्ही पक्षांचं सरकार बळकट स्थितीत आहे असंही मलिक यांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 6:18 pm

Web Title: sharad pawar slams chandrakant patil over his comment about mid term elections in maharashtra scsg 91 svk 88
Next Stories
1 मी घेतलेली लस करोनाची नाही, तर… सिरमच्या लशीवर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
2 पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून
3 हाथरस प्रकरणावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया…
Just Now!
X