“बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मागणी अजूनही अपूर्ण असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी कर्नाटकव्याप्त सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यावर आज जोर दिला. निमित्त होतं, ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही भूमिका मांडली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाभागातील नागरिकांच्या लढ्याचे वर्णन करुन वर्षानुवर्षे शेतकरी, विद्यार्थी, तरुण, वृद्ध आदी सर्वच घटकांनी हा लढा चालू ठेवला असं सुरूवातील नमूद केलं. पवार म्हणाले, “सीमाभागात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ची स्थापना करुन सत्याग्रहाची भूमिका घेतली. यासाठी अनेकांनी यातना भोगल्या. तथापि, सीमाभागातील नागरिक या सगळ्या यातना पिढ्यानपिढ्या सहन करत आहेत,” अशी हळहळ त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“महाजन आयोगाची स्थापना, मधु मंगेश कर्णिक यांच्यासह सीमाप्रश्नातील न्यायालयीन प्रकरणासाठी पुरावे जमा करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना तसेच सत्याग्रह, त्यात राजकीय नेतृत्त्वाने भोगलेला तुरुंगवास आदींचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असं पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच”; सीमावादावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

“महाराष्ट्राने सातत्याने सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दिला. एस एम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समितीची नेमणूक झाली. बाळासाहेब ठाकरे, प्राध्यापक एम. जे. पाटील असे अनेक सहकारी यामध्ये सामील झाले. सत्याग्रहाचं हत्यार पुन्हा एकदा करावं, अशी भूमिका घेतली गेली. पहिला सत्याग्रह मी करावा, नंतर सेनेच्या वतीन छगन भुजबळ यांनी करावा, असं समितीने सांगितलं. त्यानंतर सत्याग्रहांची मालिका सुरुच राहिली. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला फार त्रास दिला नाही. एक दिवस कुठेतरी ठेवलं. पण छगन भुजबळ यांच्यावर फार वेगळं प्रेम दाखवलं. भुजबळ वेशांतर करुन तिथे गेले. नटसम्राटमध्ये कुणी काम करतंय की काय अशा पद्धतीने वेशांतर करुन ते गेले. पण शेवटी एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांना ओळखलं. तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ठेवून त्यांना काही महिन्यांसाठी डांबून ठेवलं. असे अनेकांना त्या संबंध कालखंडात यातना सहन कराव्या लागल्या,” अशा आठवणी यावेळी पवारांनी सांगितल्या.