साध्या कार्यकर्त्यालासुद्धा सोबत घेऊन त्याला मोठं करण्याचं स्वप्न बाळगणारं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या शिवाजी पार्कातल्या पहिल्याच सभेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद अजूनही डोळ्यांसमोर आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहेत. ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेबांसोबतचे किस्से सांगताना रंगत आल्याचे पवार ट्विट करत म्हणाले. मराठी अस्मितेच्या धगधगत्या अंगाराच्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेब बेधडक होते, त्यांचं मत ते स्पष्ट मांडायचे असेही ते म्हणाले. शरद पवार यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलखुलास उत्तर दिले

बाळासाहेब बेधडक होते असे सांगतानाच शरद पवार म्हणाले, ‘आणीबाणीच्या काळात इंदिराजींना जाहीर पाठिंबा देण्याचं धाडस कुणामध्ये नव्हतं. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. . बाळासाहेबांना सुप्रियाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःचा उमेदवार तर दिला नाहीच, पण भाजपचाही उमेदवार उभा राहू दिला नाही. त्यांनीच सुप्रियाला बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं, असे सांगतानाच बाळासाहेबांना दिलदार म्हणायचं नाही तर काय? राजकारणात असे कोण कोणाला बिनविरोध पाठिंबा देतो का? अशी पुस्तीही पुढे त्यांनी जोडली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम सोमवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला.हा कार्यक्रम येत्या रविवार, २० जानेवारी रोजी कलर्स वाहिनीवरून सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी, विनोद कांबळी, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनीही आठवणींतील बाळासाहेब उलगडले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे आदी उपस्थित होते.