राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांनी केलेल्या अनेक कामाविषयी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय किती दुरोगामी परिणाम करणारे होते. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी आठवणींनाही त्यांनी या कार्यक्रमात उजाळा दिला. पवार म्हणाले, “१९६२ साली परदेश दौऱ्यात इजिप्तमध्ये नाईल नदीतीरावरची शेती पाहताना आपल्यासारखीच ऑईल इंजिन तिथे दिसली. इंजिनांची शहानिशा केल्यावर लक्षात आलं ते कोल्हापुरात तयार झालेलं इंजिन होतं. परतल्यावर संबंधितांनी सांगितलं की, हे इंजिन आम्ही जगभरात पाठवू शकलो ही शाहू महाराजांची कृपा!,” असं पवार म्हणाले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. कोल्हापुरात रविवारी झालेल्या या सोहळ्यात पवार म्हणाले, “गेल्या ५० वर्षांत कोल्हापूर असो व अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला, तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही. आपल्या हातात असलेलं राज्य हे रयतेसाठी कसं वापरायचं आणि ही सत्ता आपली नव्हे, तर समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी कशी वापरायची? हे सूत्र घेऊन रयतेसाठी राज्य करणारा या देशाचा राजा कोणता असा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येतं ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज,” असं शरद पवार म्हणाले.

पुढाकार घेऊन संसदेत शाहू महाराजांचा पुतळा बसवला –

“माझ्यासह महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी मिळून लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती यांच्याकडे संसदेच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता पुढाकार घेतला. आज संसदेमध्ये जाताना शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊनच जाता येतं. आरक्षणासंबंधी आजही आपल्यासमोर आव्हानं असताना त्याकाळी शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि राबवला. कारण अख्खी पिढी शिक्षित झाली पाहिजे असा विचार त्यामागे होता. समाजाला दिशा देणारं त्यांचं नेतृत्व होतं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

शिक्षण, उद्योग, कला आणि शाहू महाराज –

शाहू महाराजांच्या कारभाराविषयी शरद पवार यांनी सखोल विवेचन केलं. शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार केला. प्रशासनाचा आदर्श दाखवला. प्रशासनात शिस्त कशी असावी याचे दाखले दिले. हातात अधिकार असतानाही शेवटच्या माणसांबद्दल शाहू महाराजांच्या अंतःकरणात करुणा होती. तिथे जात-पात-धर्म त्यांनी कधी आणला नाही.

राधानगरी धरण त्याकाळात त्यांनी केवळ बांधलं नाही, तर या धरणातून विद्युत निर्मितीची तरतूद केली. वीज केवळ शेतीसाठी न ठेवता शेतीला जोडधंदा विकसित केला. उद्योगात पडावं म्हणून धंदेवाईक शिक्षण दिलं. कारखानदारी उभी करण्यात मदत केली. त्यासाठी उद्योगनगरी स्थापन केली.

शाहू महाराजांनी शिक्षण दिलं. दृष्टी दिली. साधनं मिळवून दिली. जगाची बाजारपेठ गाठण्याचे प्रयत्न करण्याचं बळ दिलं. राजकारण, समाजकारण, शिक्षण, शेती, मल्लविद्या, शिकार, उद्योग, व्यापार उदीम ते कला अशा विविध क्षेत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अमीट ठसा उमटवला.