सोलापूर : माढा लोकसभेची जागा स्वत: लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर माढा येथे येऊन जाहीर केला. या निर्णयामुळे पवार हे लोकसभा निवडणूक लढविणार की नाही, या बाबत गेले काही दिवस निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. स्वत: उमेदवार असल्याचे जाहीर करण्यासाठी पवार यांना माढा येथे यावे लागले हे उल्लेखनीय मानले जाते.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना पक्षांतर्गत साठमारीच्या राजकारणातून आडकाठी आणली गेली तेव्हाच या मतदारसंघात  स्वत: पवार हे उभे राहणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार घडलेल्या घडामोडी तशाच स्वरूपाच्या राहिल्या. पवार यांच्या उमेदवारीची चाहूल लागताच स्वत: खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच पुढाकार घेऊन पुण्यातील पक्षाच्या बैठकीत पवार यांना माढय़ातून लोकसभा लढविण्याचे आवाहन केले. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या. इकडे माढा लोकसभा मतदारसंघातील शेकापचे नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी पवार यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यावर पवार यांनी नेत्यांच्या इच्छेचा मान राखत उमेदवारीचा विचार करण्याचे संकेत दिले होते. गेले आठवडाभर पवार यांच्या उमेदवारीविषयी राज्यातील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. अखेर पवार यांनी स्वत:ची उमेदवारी माढय़ात येऊन घोषित केली आणि सर्वाना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. माढा मतदारसंघातील सारीच नेतेमंडळी कामाची आहेत. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला संधी दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

मोदी सरकारवर टीकास्त्र

माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे यानिमित्ताने आयोजिलेल्या मेळाव्यात पवार यांनी स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या मेळाव्यास खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष बळीराम साठे आदी उपस्थित होते. या सर्वानीच पवार यांना माढा लोकसभा लढविण्यासाठी जोरदार आग्रह धरला होता. माढय़ातील मेळाव्यासाठी आल्यानंतर प्रसार माध्यमांशीही पवार यांनी संवाद साधला. नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जात आहे. हा प्रकार उघड उघड सत्तेचा दुरुपयोग करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत पवार यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.