पवार यांचा उदयनराजेंना टोला; साताऱ्यात राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

दिल्ली दरबारात झालेला अपमान सहन न झाल्याने तख्त लाथाडून इतिहास घडविणारे व आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवणारे छत्रपती कुठे आणि सत्तेसाठी लाचारी पत्करणारे आत्ताचे त्यांच्या गादीचे वारस कुठे. त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन हे बरं नव्हं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.

उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार पहिल्यांदाच सातारा जिल्ह्य़ात आले होते.   सातारा येथील या मेळाव्यात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल, असा शब्द त्यांनी दिला होता. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण, राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला. यानंतर आणि आता? असा प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला.