महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नुकसान झालेल्या शेतमालाची पहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज नाशिकमध्ये दाखल झाले.

नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पवारांनी भेट घेतली. इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांमधील शेतकऱ्यांनी पवारांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अगदी शेतामध्ये जाऊन पवारांनी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पिकांची पहाणी केली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि झालेल्या नुकसानाची माहिती पवारांना दिली. “आमच्या हाती आलेलं पीकं या पावसामुळे गेलयं. आमचं खूप नुकसान झालंय साहेब. जगावं की मरावं असा प्रश्न आहे,” अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवारांसमोर मांडल्या.

तसेच शेतमालाच्या नुकसानीची पहाणी करायला कोणताही सरकारी अधिकारी गावात आला नाही अशी तक्रारही या शेतकऱ्यांनी पवारांकडे केली. काही उपस्थित महिलांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे भाजपा सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भाजपा सरकारच्या नावाने बोटं मोडत नाराजी व्यक्त केली.

नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी जाधववाडी गावातील द्राक्ष उत्पादकांची भेट घेत द्राक्ष बागांची पहाणी केली. “परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तडे जाऊन मणी गळून पडत आहेत,” असं ट्विट पवारांच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

तसेच प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच शेतमालाचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज बांधता येत असल्याचेही पवारांनी म्हटले आहे. “परतीच्या पावसादरम्यान अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानाचा प्रत्यक्ष भेटीदरम्यान सखोल अंदाज येत आहे,” असं ट्विट पवारांनी केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यभरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानेच त्वरित पंचनामे करण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली आहे.