मालवण देवली येथील कोळंबी प्रकल्पाला माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. कोळंबी प्रकल्पस्थळी काही तज्ज्ञांना त्यांनी पाचारण केले होते.
गोवा येथे शरद पवार आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे व राज्य उपाध्यक्ष अबीद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर व्हिक्टर डॉन्टस यांनी कोळंबी प्रकल्पाला भेट देण्याची विनंती केली.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर यापूर्वी ते आले असता कोळंबी प्रकल्प पाहाणीसाठी खास वेळ देऊन यायचे. आजचा दौराही खास कोळंबी प्रकल्पाच्या भेटीसाठी होता, असे ना. पवार यांनी सांगितले. देवली येथे कोळंबी शेतीमधील तज्ज्ञांनाही त्यांनी पाचारण केले होते.
सिंधुदुर्ग कृषीविषयक माहिती घेताना त्यांनी आंबा बागायतीबाबतही माहिती घेतली. कोळंबी प्रकल्प, आंबा, काजू, मत्स्यशेतीबाबतही त्यांनी विवेचन केले. त्यांचे स्वागत या वेळी करण्यात आले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुरेश दळवी यांच्यासह जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवीत त्यांचे स्वागत केले. कोळंबी शेती प्रकल्पाला भेट देऊन मत्स्य विकास शेतकऱ्यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय कृषिमंत्री असताना मत्स्य विकास खाते त्यांच्याकडे होते. त्यांनी त्या काळात विविध योजना आणल्या होत्या, त्याबाबतची माहिती घेतली.  पर्यटन, फलोद्यान व मत्स्य विकासाबाबत ना. शरद पवार यांनी चर्चा करून सर्वाना मार्गदर्शन केले.