04 August 2020

News Flash

“…ती वेळ येऊ देऊ नका”; सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना पवारांचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (Photo : SharadPawar/Twitter)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांकडून टाळाटाळ केली जात आहे. यावर चिंता व्यक्त करत पवार यांनी डॉक्टरांनाही इशारा दिला.

शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला.

“राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये, ही आमची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते,” असा इशारा पवार यांनी दिला.

“खासगी रुग्णालये जास्तीचं बिल घेत आहेत. त्यांचे ऑडिट केलं जात असून, यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांनीही आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये. आर्थिक संकट मोठं आहे. लॉकडाउनचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात यावा. मात्र, स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा कशा प्रकारच्या आहे, त्यावरून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात यावा,” असं पवार म्हणाले.

“करोनालासोबत जगावे लागेल, असं अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे आढावा घेत आहोत. धारावी प्रमाणेच मालेगावला प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहे,” असं सांगत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मुस्लिम समाजालाही आवाहन केलं. “रमजान ईदप्रमाणेच मुस्लिम समाज सामंजस्य दाखवेल,” असं पवार म्हणाले.

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकला भेट देण्याची इच्छा आहे, ते येतीलच. पण आम्ही आमचे निरीक्षण घेत आहोत. मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय घेतील. मात्र, देवेंद्र फडणवीस व भाजपानं राजकारण करू नये,” अशी टीका पवार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 6:43 pm

Web Title: sharad pawar warns to private hospitals and doctors bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 वर्धा : करोनाबाधितांचा मृतदेह भरवस्तीतून नेऊ नका; नागरिकांची मागणी
2 उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग होणार शंभर खाटांचा
3 दीपिका, प्रियांकासहीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार?; गृहमंत्र्यांनी केलं ‘हे’ वक्तव्य
Just Now!
X