राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी उद्या पुण्यातील हडपसर येथे होणार आहे. मात्र, या विवाहासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार या विवाहाला उपस्थित राहणार नाहीत. यामागे त्यांच्या प्रकृतीचे कारण असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.

रविवारी (दि.२९) पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीदरम्यान शरद पवारांच्या बोटाला दुखापत झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील पंधरा दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या विवाह सोहळ्यासही ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून आर. आर. पाटील म्हणजेच आबा पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. त्यांच्या एकनिष्ठतेमुळे शरद पवार यांनी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री यांच्यासह अनेक मंत्रीपदांवर काम करण्याची संधी दिली. शरद पवारांनी सोपवलेल्या जबाबदारीला आबांनी कायम न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आबा हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. आबांच्या निधनानंतर पवार कुटूंबिय कायम पाटील परिवारासोबत राहिले.

दरम्यान, आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या मुलीचे म्हणजे आबांची मुलगी स्मिता यांच्या विवाहासाठी खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांचे स्थळ सुचवले. त्यानुसार, स्मिता आणि आनंद यांचा विवाह नोव्हेंबर २०१७ मध्येच निश्‍चित करण्यात आला.

आनंद थोरात यांनी ऑस्ट्रेलियात बिझनेस मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते पुण्यामध्ये व्यावसायिक आहेत. या दोघांचा साखरपुडा १० डिसेंबर २०१७ रोजी अंजनी येथे आबांच्या गावी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर आता उद्या पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे त्यांचा विवाह पार पडणार आहे.