सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंधरा दिवसही उलटत नाहीत तोच माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा पुन्हा वाढला आहे. सद्य:स्थितीत विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित मानले जात असताना पुन्हा इतर इच्छुकही पुढे आले आहेत. म्हणजे यापूर्वी पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याअगोदर जो गोंधळ होता, तोच गोंधळ आता पुन्हा निर्माण झाल्याचे दिसून येते. हा संभाव्य गोंधळ आणि पक्षांतर्गत साठमारीचे राजकारण थोपविण्यासाठी शेवटी पवार यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जाते.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीमध्ये गोंधळ निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर शेवटी गेल्या महिन्यात खासदार मोहिते-पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन माढय़ातून शरद पवार यांनीच उभे राहावे म्हणून गळ घातली होती. त्यास पक्षातील इतर नेत्यांनीही साथ देत त्यांना माढय़ासाठी प्रेमाचा आग्रह धरला होता. त्यामुळे शेवटी पवार यांनी गेल्या २१ फेब्रुवारी रोजी माढय़ात येऊन स्वत:च्या उमेदवारीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर माढय़ातील राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत होती. परंतु उमेदवारी घोषित करून पंधरा दिवसही उलटत नाहीत, तोच पवार यांनी पुन्हा आपला उमेदवारीचा निर्णय बदलला आणि माघार घेतली. त्यामुळे माढय़ात राजकीय गोंधळ उडाला आहे.

पवार यांच्या पश्चात पक्षाकडून उमेदवारीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तशी चर्चा सुरू असतानाच सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव पुन्हा इच्छुक म्हणून पुढे आले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील इच्छुक आहेत. पवार यांनी स्वत: उमेदवार असल्याचे जाहीर करण्यापूर्वी जी स्थिती पक्षात होती, तीच स्थिती पुन्हा उद्भवल्यामुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता हा गोंधळ शमविण्यासाठी शेवटी पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

इकडे गेले पंधरा दिवस माढय़ातून स्वत: शरद पवार हे उभे राहणार असल्यामुळे भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणारे ‘अजितनिष्ठ’ संजय शिंदे आणि भाजपचे सहयोगी सदस्य, आमदार प्रशांत परिचारक यांची कोंडी झाली होती. आता पवार यांनी माघार घेतल्यामुळे शिंदे व परिचारक यांना भाजपला साथ देण्याचा मार्ग मोकळा होणार काय, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, संजय शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. येथे भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी माढय़ात जनसंपर्क वाढविला आहे. परंतु संजय शिंदे व आमदारपरिचारक यांचे सहकारमंत्री देशमुख यांच्याशी जुळत नाही. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.