एजाज हुसेन मुजावर

माढा लोकसभेसाठी अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी घोषित करताना एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.  गेल्या दहा वर्षांत सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पंख छाटण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना पक्षात त्यांचे भवितव्य काय असेल, तसेच दुसरीकडे पक्षात राहून मोठे होत आणि हळुवारपणे भाजपशी जवळीक वाढविणाऱ्या माढय़ाच्या शिंदे बंधूंनाही काबूत ठेवण्याची पवार यांची भूमिका कशी असेल, याविषयीची उत्सुकता यानिमित्ताने वाढली आहे.

पवार यांनी जिल्ह्य़ात बस्तान बसविण्यापूर्वी मोहिते-पाटील घराण्याकडे जिल्ह्य़ाची सत्तासूत्रे होती. कालांतराने पवार हे २००९ साली प्रथमच माढा लोकसभा मतदारसंघाची जागा लढविण्यासाठी आले. तेव्हा सर्वांनी मोठय़ा अपेक्षेने त्यांना भरघोस मतांची आघाडी देऊन निवडून पाठविले. या माध्यमातून पवार यांचा सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारणाशी थेट संबंध आला, तसे मोहिते-पाटील गटाचे महत्त्व संपायला सुरुवात झाली.

पाच वर्षांपूर्वी देशात मोदी नावाचे वादळ घोंगावण्यापूर्वीच राजकीय वाऱ्याची दिशा अचूकपणे ओळखून शरद पवार यांनी यापुढे निवडणुका लढविणार नसल्याचे जाहीर केले आणि मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीस माढा मतदारसंघातून स्वत: उभे न राहता विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी आणली. खरे तर त्यावेळी एकीकडे मोदी लाट आणि दुसरीकडे पक्षांतर्गत वाढलेली साठमारी वाढली असताना मोहिते-पाटील यांचा निभाव लागणे महाकठीण होते. तरीही मोहिते-पाटील हे कसेबसे निवडून आले.

या पार्श्वभूमीवर मोदी लाट ओसरली आणि मोहिते-पाटील पुन्हा माढय़ाची जागा लढविण्यासाठी तयारी करीत असताना यंदाही पक्षातून त्यांना विरोध होऊ लागला. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे पवार यांच्या सूचनेवरून आपण माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत फिरू लागले. त्यांना पक्षातील मोहिते-पाटीलविरोधकांचेही समर्थन मिळू लागले. त्यातून उमेदवारीचा तिढा कसा वाढत राहील, याचीच रणनीती पक्षांतर्गत संघर्षांतून आखली जाऊ लागली. या घडामोडीमागे दस्तुरखुद्द पवार हेच आहेत, हे ओळखून शेवटी मोहिते-पाटील यांनीच माघार घेत थेट पवार यांनाच माढय़ातून उभे राहण्यासाठी प्रस्ताव दिला. अर्थातच, पुढे सर्व नेतेमंडळींचा आग्रह अव्हेरत नाही म्हणून माढय़ातून आपणच उभे राहणार असल्याचे घोषित केले. इकडे पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होण्यापूर्वी माढय़ात मोहिते-पाटील यांना रोखण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी तयारी चालविली होती. माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे धाकटे बंधू तथा भाजपपुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कारभार सांभाळणारे ‘अजितनिष्ठ’ संजय शिंदे यांचा तर मोहिते-पाटील यांना उघडच विरोध आहे. संजय शिंदे हे एकीकडे भाजपला पक्षप्रवेशासाठी झुलवत ठेवत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांना राजकीय निर्णय घ्यावा लागणार होता, परंतु आता थेट पवार यांचीच उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे यांना भाजपची साथ सोडावी लागणार आहे.

माढय़ात आमदार बबनराव शिंदे यांच्या वाडय़ावर पवार हे उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी मेळाव्याच्या निमित्ताने आले असताना त्यांच्या स्वागताला संजय शिंदे हे जातीने हजर होते. तेथील घडामोडीतून शिंदे हे पवार यांना साथ देणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले असले, तरी दुसरीकडे जिल्हा परिषदेत त्यांना भाजपची साथ सोडून द्यावी लागणार आहे. भाजपशी असलेले नाते तोडावे लागले तरी त्यांच्याकडील जिल्हा परिषद अध्यक्षपद शेवटी पवार यांच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. कारण जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष आहे.

माढय़ासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे. प्रत्येक तालुक्यात सुभेदार निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर कोणाचे कसलेच नियंत्रण राहिले नाही. करमाळ्यापासून ते अक्कलकोटपर्यंत तसेच माढा लोकसभा मतदारसंघाशी संबंधित सातारा जिल्ह्य़ातही हेच चित्र दिसून येते.

एकूणच विस्कळीत झालेली पक्षाची घडी पुन्हा नीटनेटकी बसविण्यासाठी पवार यांना पुन्हा माढय़ात यावे लागले आहे.