बँकांतील ठेवीसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत सहकारी बँकांचे नियंत्रण दिल्याने सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकार वाटचाल करत असल्याचे दिसते आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीनेच मोदी सरकार वाटचाल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतल्याचे दिसून आले. “ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही”, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता केली आहे.

शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की,  ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, त्यांची अनामत जप्त झाली आहे. अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिले आहे. अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही. असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.