संवेदनशीलतेचा कडेलोट दर्शवणाऱ्या घटनेने समाजमन व्यथित

लातूर : ती अल्ववयीन. अठरा वर्षांच्या आतीलच. महाविद्यालयात शिकताना एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. प्रेम फुलले. पण नंतर भंगले. मग नैराश्याच्या गर्तेत ती सापडली. तिच्या सैरभर मनात थेट मृत्यूला कवटाळण्याच्या विचाराचे काहुर माजले. आता जिवाचा कडेलोटच करायचा, या विचाराने तिने एक बहुमजलीचे टोक गाठले. अंग झोकूनच द्यायचा अवकाश होता फक्त. तिची मानसिकताही तेवढय़ा टोकाला पोहोचलेली होती. जमिनीवरून तिला पाहणारे असंख्य डोळे होते. पण सारे आपल्या मोबाइलमध्ये ती कधी उडी मारते याचे चित्रीकरण करण्याच्या तयारीला लागलेले.. लातुरमधील गुरुवारी रात्रीचा हा प्रसंग. म्हटला तर थरकाप उडवणारा अन् म्हटला तर असंवेदनशील मनाचा आणि कडेलोट झालेल्या माणुसकीचे दर्शन घडवणारा..

शहरातील औसा रस्त्यावरील रेमंड शोरूमच्या शेजारी बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रात्री तळमजल्यावर एक सुरक्षारक्षक होता. नऊच्या सुमारास एक तरुणी हातात दफ्तर घेऊन अंधारात इमारतीचा जिना चढत असल्याचे त्याने पाहिले व तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती अतिशय वेगाने चौथ्या मजल्याच्या गच्चीवर गेली. कठडय़ावर बसून पाय खाली सोडून ती रडू लागली. याची माहिती सुरक्षारक्षकाने मालकाला दिली व मालकाने पोलिसांना सांगितली. दरम्यान, रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. पाहता पाहता व्हीडिओ शूटिंग करणाऱ्यांची गर्दी झाली. काही महाभागांनी ही घटना फेसबुक लाइव्ह करण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी त्या मुलीला बोलण्यात गुंगवले. तिने काही दूरध्वनी नंबर दिले व त्याला व्हीडिओ कॉल करा व मी आत्महत्या करत असल्याचे सांगा, असे ती म्हणाली.

दरम्यान, अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या इमारतीच्या खाली जाळीचे आच्छादन तयार केले. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी इमारतीच्या जिन्यावर जाऊन मागील बाजूने त्या तरुणीला पकडून खाली आणले. महिला पोलीस कर्मचारी अधिकारी त्यांच्यासमवेत होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलीला नेऊन तिचे म्हणणे ऐकून घेतले. प्रेमभंगातून आपली मानसिक अवस्था बिघडली असल्याचे तिने सांगितले. ती बाहेर जिल्हय़ातील विद्यार्थिनी असून ती शहरात एका खासगी वसतिगृहात राहते. पोलिसांनी तिच्या आई, वडील व नातेवाइकांना संपर्क साधला आणि तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात रात्री उशिरा तिला सुपूर्द करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे काही लाभ असले तरी मानवी विकृती वाढवण्यालाही तेच यंत्र कारणीभूत होत असल्याने वाढलेल्या चिंतेने समाजमन मात्र व्यथित झाल्याचे संवेदनशील लातूरकरांना या प्रसंगातून पाहायला मिळाले.