शौचालय बांधण्यासाठी चक्क स्वतःचे मंगळसूत्र मोडणाऱया महिलेला तिचे मंगळसूत्र परत मिळवून देणे, हे योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे सांगत पुढील काळात राज्यात जास्तीत जास्त शौचालये बांधण्यावर आपला भर असेल, असे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मंगळसूत्र हे महिलेच्या सौभाग्याचे लेणं आहे. ते परत करण्याची एक महिला म्हणून जबाबदारी असल्याची आपली भावना असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाशिम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे यांनी धाडसी पाऊल उचलून इतरांना नवा आदर्श घालून दिला आहे. सायखेडा गावात राहणाऱ्या संगीता यांनी घरात शौचालय बांधण्यासाठी चक्क स्वत:चे मंगळसूत्र विकले. गावात शौचालय नसल्यामुळे संगीता यांना उघड्यावर शौचाला जावे लागत असे. गाडी आली, सायकल आली की उठायचे आणि पुन्हा बसायचे असा त्रास त्यांना नेहमी सहन करावा लागायचा. यासाठी त्यांनी पतीकडे घरात शौचालय बांधून घेण्यासाठी तगादाही लावला होता. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांचे पती शौचालय बांधू शकत नव्हते. अखेर शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र मोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सुरूवातीला या निर्णयामुळे संगीता यांना मोठा विरोध सहन करावा लागला. पण संगीता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करीत पंकजा मुंडे यांनी मुंबईत त्यांचा सत्कार केला.