विनोबा भावे यांचे जन्मस्थान असणारे पेण तालुक्यातील गागोदे गाव शीना बोराच्या हत्येमुळे पुन्हा एकदा चच्रेत आले आहे. शीनाचा मृतदेह गागोदेनजीकच्या जंगलात टाकल्याचे स्पष्ट झाल्याने एकाएकी गागोदेला ‘पीपली लाइव्ह’चे स्वरूप प्राप्त झाले.
शीना बोराच्या हत्येचे गूढ उलगडल्याचे समजताच माध्यमांचे प्रतिनिधी, त्यांच्या ओबी व्हॅन्स गागोदे परिसरात दाखल झाल्या. तीन वर्षांपूर्वी गावाजवळ सापडलेल्या एका अज्ञात मुलीच्या मृतदेहाविषयी गावातील लोकांकडे  विचारणा सुरू झाली. मराठी, िहदी आणि इंग्रजी माध्यमांच्या वाहिन्यांवर गावाची चर्चा सुरू झाली.  घटना कधी घडली, कशी घडली, मृतदेह कधी सापडला, कसा सापडला, मृतदेहावर कोणत्या रंगाचे कपडे होते यांसारख्या एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार स्थानिकांवर करण्यात आला. गावकऱ्यांनीही आपापल्या परीने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. एरव्ही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणारे व भूदान चळवळीचा वारसा लाभलेले आणि ग्रामदानाची संकल्पना यशस्वी पद्धतीने राबवणारे हे गाव अचानक अशा प्रकारे प्रकाशझोतात आले. पेण, खोपोली मार्गावरील गागोदे गावाजवळील जंगलात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. घटनेच्या सात ते आठ दिवसांनी या परिसरात विचित्र वास येत असल्याने स्थानिकांच्या ही घटना लक्षात आली होती. मात्र मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या घटनेला तीन वर्षे लोटली. त्यामुळे हे प्रकरण तपासाविनाच संपले असा समज अनेकांचा झाला होता. मात्र इंद्राणी मुखर्जीच्या अटकेनंतर या हत्या प्रकरणाला वाचा फुटली आणि गूढ उलगडले.