अंबाजोगाई, माळशिरस तालुक्यातील चार मेंढपाळांच्या 78 मेंढ्या चार्‍यातून झालेल्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना 11 व 12 जुलै रोजी हिंगळजवाडी येथे घडली. यामुळे मेंढपाळाच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त मेंढपाळांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

अंबाजोगाई, बीड व माळशिरस येथील मेंढपाळ दिवाळीपासून मेंढ्या जगवण्यासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद तालुक्यात फिरत होते. बुधवार, दि. 10 जुलै रोजी कोंड येथील मुक्कामानंतर हिंगळजवाडी येथे मुक्कामासाठी आल्यानंतर गुरूवार, 11 जुलै रोजी काही मेंढ्या अचानकपणे मरण पावल्या. तर काही मेंढ्या घरी येऊन पडल्या म्हणून या मेंढपाळांनी त्यांच्याजवळ ठेवलेली औषधे देऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम नाही. शुक्रवारपर्यंत मृत मेंढ्यांची संख्या 78 पर्यंत पोहोचली होती. यामध्ये दाजी माणिक गोरड, पोपट गोरड व अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी येथील भाऊराव करे व दत्तू शेळके या चार मेंढपाळांच्या 78 मेंढ्या विषबाधा होऊन मेल्याने मेंढपाळांचे जवळपास आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

हे मेंढपाळ दिवाळीनंतर उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह 430 मेंढ्यांचा कळप घेऊन या भागात भटकंती करीत होते. त्यादरम्यान, चरत चरत येत असताना मेंढ्यांना विषबाधा झाली. यावेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव अघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डॉ स्वप्नील जिंतपुरे, डॉ. एस. पी. नागरगोजे, पशुधन पर्यवेक्षक बी. एम. कुंभार,  परीचर एस. एस. फंड, जे. एस. सुरवसे आदिंसह पशुसंवर्धन खात्याच्या अधिकारी कर्मचार्‍यांनीं उर्वरित 126 मेंढ्यांवर उपचार केले. विषबाधेमुळे आणखीन मेंढ्यांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.