News Flash

शेगाव विकास आराखडय़ातील कामात दिरंगाई केल्यास दंडात्मक कारवाई

संतनगरी शेगांवच्या विकासासाठी शासनाने ४९६.४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यातील ६१.०३ कोटी रुपयांची काम पूर्ण झाली असून १२०.४३ कोटी रुपयांची काम प्रगतीपथावर

| January 15, 2015 07:03 am

संतनगरी शेगांवच्या विकासासाठी शासनाने ४९६.४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यातील ६१.०३ कोटी रुपयांची काम पूर्ण झाली असून १२०.४३ कोटी रुपयांची काम प्रगतीपथावर आहेत. आराखडय़ातील मंजूर कामे तातडीने पूर्ण करावी. दिरंगाई केल्यास संबंधित अंमलबजावणी यंत्रणेवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी झालेल्या शेगांव विकास आराखडा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य अभियंता मंडपे, जिल्हा पोलीस अधीक्षक शामराव दिघावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते. उनाड नाला सरळीकरणाची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी. उनाड नाल्याचे सरळीकरण नाल्यावर स्लॅब टाकून स्कायवॉक उभारण्याची योजना आहे. ते बांधल्यास आनंदसागर ते मंदिर जोडल्या जाणार आहे. यामुळे आनंदसागर येथून मंदिरापर्यंत क मी वेळात भाविकांना पोहोचता येईल. गजानन महाराज मंदिराजवळील मातंगपुरा वस्तीचे पुनर्वसन करावे. तोवर तेथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देऊन ते म्हणाले, येथील नागरिकांना म्हाडामार्फत घरकुले देण्यात येणार आहेत. खळवाडी येथील वस्तीचेही पुनर्वसन कार्य वेगाने पूर्ण करण्यात येईल. अकोट रस्त्यावरील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले, उर्वरित काम निधीअभावी बंद असल्यास निधी उपलब्ध करून दिल्या जाईल.
शेगांव शहरातील भूमिगत गटाराची खोळंबलेली काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना असुविधा निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असेही त्यांनी शासन यंत्रणेला निर्देश दिले. शेगांव विकास आराखडय़ासंदर्भात शिखर समितीकडून ७ जुलै २०१४ रोजी १३६ कोटी रुपयांचा वाढीव आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यात हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, शहर सौदर्यीकरण, भूमिगत गटार, उनाड नाला सरळीकरण व स्कॉयवॉक विस्तार, वाहनतळ, तसेच अंतर्गत रस्ते आदी कामे केली जाणार असून, याप्रसंगी आराखडय़ातील कामांची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेल्या फोट्रेस कंपनीने सादरीकरण केले. आराखडय़ात अंतर्भूत असलेल्या शेगांव पाणी पुरवठा योजना व बसस्थानक अद्ययावतीकरण, शहराला जोडणारे रस्ते, रुग्णालय, पोलीस ठाणे, विश्राम भवन आदी कामे पूर्ण झाली आहेत. प्रगतीपथावराल कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. योवळी नियोजनचे उपायुक्त वा.बा. काळे, शेगांवचे नगरसेवक किरणबापू देशमुख, शरद अग्रवाल, दिनेश लहाने, तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 7:03 am

Web Title: shegaon development plan
टॅग : Maharashtra
Next Stories
1 लातुरात गडकरी-मुंडे समर्थकांमध्ये वादंग
2 नाशिकमध्ये जवानांचा पोलीस ठाण्यावर हल्ला
3 माळशेज रेल्वेचा चेंडू राज्याच्या कोर्टात!
Just Now!
X