सेना-मनसेपाठोपाठ आता शेकापनेही परप्रांतिया हटावचा नारा दिला आहे. स्थानिकांना डावलून परप्रांतीय कामगारांची नोकरभरती करणाऱ्या खालापूर तालुक्यातील अ‍ॅडलॅब इमॅजिका कंपनीविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. स्थानिकांना कंपनीने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३० नोव्हेंबरला कंपनीवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
खालापूर तालुक्यातील देवकान्हे, खानाव व वडवळ या तीन ग्रामपंचायत हद्दीत दोन वर्षांपूर्वी अ‍ॅडलॅब इमॅजिका कंपनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र नोकरभरतीत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती केली आहे. त्यामुळे शेकाप आक्रमक झाली आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात परप्रांतीय विरोधात सुरुवातीला शिवसेना आणि नंतर मनसे आक्रमक झाली होती. त्यावेळी त्याचे देशभरात पडसाद उमटले होते. आता डाव्या विचारसरणीचा शेकापही परप्रांतीया विरोधात आक्रमक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    
दरम्यान परप्रांतीय हटाव हा केवळ एक मुद्दा आहे. याव्यतिरिक्त सिंचनासाठी व पिण्यासाठी असणारे कलोते धरणाचे पाणी कंपनीने बोकायदेशीर उचलेले आहे. यामुळे परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. कंपनीच्या वाहतुकीमुळे खोपोली-पाली मार्गाची दुरवस्था झाली आहे. कंपनीने वाहनतळाची व्यवस्था केली नसल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीही होत असल्याचा आरोप शेकापने केला आहे. अ‍ॅडलॅब इमॅजिका कंपनी देवकान्हे, खानाव व वडवळ या तीन ग्रामपंचायत हद्दीत येत आहे. कंपनीने या ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. मात्र या बांधकामांचा कर ग्रामपंचायतींना देण्यास कंपनी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेकापने केला आहे.
यामुळे कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, ३० नोहेंबर रोजी कंपनीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेकापने जाहीर केले आहे. मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील करतील. या मोर्चात आमदार धर्यशील पाटील, आमदार पंडित पाटील, माजी आमदार विवेक पाटील, पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, महेंद्र थोरवे सहभागी होणार आहेत. या मोर्चात स्थानिकांसह हजारो कार्यकत्रे उपस्थित राहतील, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान शेकापने कंपनीवर केलेले आरोप निर्थक आहेत. कंपनीतील नोकरभरतीमध्ये ९० टक्के स्थानिकांना प्राधान्य दिले आहे. तसेच कंपनी बेकायदेशीर पाणी उपसाही करीत नाही. उलट कंपनीने या परिसरातील गावांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शेकापचे सविस्तर निवेदन आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर आमची भूमिका मांडू, असे अ‍ॅडलॅब इमॅजिकाचे जनसंपर्क अधिकारी जगन्नाथ ओव्हाळ यांनी सांगितले.