मतिमंद मुलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात आल्यावर सुरेखा यांनी त्यांच्यासाठीच काम करायचं निश्चित केलं. त्यासाठी आधी बी.एड. केलं त्यानंतर पीएच. डी. ही मिळवली. रायगड जिल्ह्य़ातील या मुलांसाठी कोणतीच संस्था नसल्याने पेणमध्ये संस्था उभारली. दारोदार फिरत, मुलांच्या पालकांना विश्वासात घेत, प्रचंड कष्ट करत त्यांनी सुरुवातीला १० मुलं मिळवली. पुढे त्यांचं काम पाहून मुले यायला लागली. आज तेथे १२० मुलं आहेत. प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या, शाळेतील मुलांना स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील या दुर्गेच्या कर्तृत्वाला आमचा सलाम!
संस्थेकडे केवळ १२०० रुपये उरले असल्याने दैनंदिन खर्चाचा गाडा कसा हाकायचा, या विचाराने चिंतित, काहीशा विमनस्क अवस्थेत डॉ. सुरेखा पाटील शाळेत बसल्या होत्या. तेव्हा एक वृद्ध स्त्री तेथे आली. तिने तिचं मंगळसूत्र त्यांच्या हातात ठेवलं. म्हणाल्या, ‘‘नुकतंच माझ्या पतीचं निधन झालं आहे. त्यांची इच्छा होती की एखाद्या सेवाभावी संस्थेला या मंगळसूत्राचं सुवर्णदान द्यावं. त्याप्रमाणे मी तुम्हाला देते आहे.’’ सुरेखाताईंना ते स्वीकारता येईना. त्यांनी ते मंगळसूत्र परत दिलं. त्या निघून गेल्या खऱ्या पण काही वेळाने परत आल्या तेव्हा त्यांच्या हातात २९ हजार रुपये होते. गावातील सोनाराकडे मंगळसूत्र विकून ते पैसे घेऊन त्या आल्या होत्या. साश्रुनयनांनीच डॉ. पाटील यांनी ही मदत स्वीकारली.
समाजातल्या मतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्याची जिद्द बाळगून अनंत अडचणींपुढे न डगमगता कार्य करणाऱ्या डॉ. सुरेखा पाटील यांना अडीअडचणीच्या प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी मदतीचा हात कायमच दिला आहे. या मंगळसूत्राच्या सुवर्णदानाने तर त्यांना ‘अक्षयपात्र’च मिळालं.त्यानंतर त्यांच्या कार्याने भारावून जाऊन अनंत हस्ताने मदतीचा ओघ सुरू आहे आणि त्यातून मतिमंदासाठी आधारवड ठरलेल्या ‘सुहित जीवन ट्रस्ट’ या संस्थेचा वटवृक्ष फोफावत आहे.
डॉ. सुरेखा पाटील या मूळच्या मुंबईच्याच. बीकॉमपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांचा विवाह झाला. मदर तेरेसा, महात्मा गांधी आादींच्या जीवनकार्याविषयीचं वाचन आपल्याही हातून असं काही वेगळं घडलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. एकदा रस्त्यात मैत्रीण भेटली. ती कॉटनग्रीन येथील मतिमंदांच्या शाळेत काम करीत होती. तिच्याकडून या मुलांविषयी समजलं. आतापर्यंत वेडे आणि शहाणे अशा दोन व्यक्तीच होत्या. मतिमंद असणं म्हणजे काय, याची माहिती घेण्यासाठी त्या तिच्याबरोबर शाळेत गेल्या. वयाने मोठी असलेल्या मुलांचं लहान मुलांनाही लाजवेल असं वागणं पाहून त्यांची अवस्था आणि त्यांना सांभाळण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. याच मुलांसाठी ठोस काहीतरी करायचं, असं त्यांनी नक्की ठरवलं.
त्यासाठी आधी स्वत:मध्ये काही गोष्टी येणं आवश्यक होतं. मतिमंद मुलांना शिकवून स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याचं ठरविलं. शिवडी येथील ‘माईंड्स कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन’मध्ये १९९७-९८ या वर्षी पदवी मिळालेल्या डॉ. पाटील यांना विद्यापीठातून विशेष प्रावीण्य श्रेणी मिळवली. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १४ हजार रुपये शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने अंगावरील दागिने विकून त्यांनी ते पैसे उभे केले आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. मुलगा तीन वर्षांचा असताना घरची जबाबदारी सांभाळून शिक्षण घेणाऱ्या डॉ. सुरेखा यांना अभ्यास करताना अनेकदा पहाटेचे चार-पाचही वाजायचे.
पेण हे त्यांच्या सासरचं गाव. मुंबईत मतिमंद मुलांसाठी काही शाळा आहेत, पण रायगड जिल्ह्य़ात तशी काहीच व्यवस्था नाही. त्यामुळे पेणमध्ये २००४ मध्ये कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी डॉ. पाटील यांनी पावलं टाकली. ‘मतिमंद’ ही संकल्पना त्यावेळी फारशी प्रचलित नसल्याने मुलांना वेडं समजून केवळ खायला-प्यायला घालून मोकळं सोडायचं, ही पद्धत होती. मोलमजुरी करणाऱ्या एका कुटुंबात तर आई-वडील घराबाहेर जाताना मुलाने कुठे बाहेर जाऊ नये, यासाठी बांधून ठेवत. त्यामुळे जिल्ह्य़ातील मतिमंद मुलांचं सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी अक्षरश: खेडय़ापाडय़ात प्रवास केला. अनेक वेळा हा प्रवासही निराश करणारा होता. काही घरी शिव्याशाप
मिळायचे तर काही जण घराचे दार लावून घ्यायचे. या मुलांना शिकवायचं कशाला, बॅरिस्टर करायचं आहे का, असंही त्यांच्या घरच्या मंडळींकडून
ऐकावं लागलं. सात-आठ महिन्यांच्या सर्वेक्षणानंतर १७० मुलं आढळून आली. पण घरच्या मंडळींची समजूत पटवून त्यापैकी १० मुलांना शाळेत आणण्यात त्या यशस्वी झाल्या. महाडिक वाडीतील एका चाळीत दोन खोल्यांमध्ये २००४ मध्ये ‘सुमंगल’ शाळेची सुरुवात झाली. मुलांना घरून आणण्या-पोचविण्यासाठी बसची व्यवस्था केली. आणि डॉ. सुरेखा यांचं कार्य खऱ्या अर्थाने
आकार घेऊ लागलं. मुलांच्या पालकांना खात्री पटली आणि शाळेतील मुलांची संख्या वाढत आज ती १२० पर्यंत गेली आहे.
या मुलांना शिक्षण देतानाच त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याचा शोध घेऊन स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी काही प्रशिक्षण देणं गरजेचं होतं. त्यातून ‘एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रा’ची सुरुवात करण्यात आली. तर मतिमंदत्व विषयावर डी.एड.अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात आलं. एवढय़ा मोठय़ा संस्थेचा गाडा मुलांकडून कोणतंही शुल्क न घेता केवळ देणग्यांच्या आधारे चालविणं, हे सोपं काम नव्हतं. संस्थेमध्ये आज सुमारे २० शिक्षक व अन्य कर्मचारी आहेत. ही माणसं काही पैशांनी उभी राहिलेली नाहीत, ती एका ध्येयाने व प्रेमाच्या बळावर काम करीत आहेत, असं डॉ. सुरेखा कृतज्ञतापूर्वक सांगतात. काही वेळा त्यांचा पगार देण्यासाठी पैसे नव्हते. तरी सर्वानी सांभाळून घेतलं.
या शाळेत शिकलेली निमिषा पाटील ही आज १७ वर्षांची आहे. मतिमंदत्वाचं ओझं खांद्यावर असलेल्या आपल्या मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होणार, याची चिंता तिच्या आईला लागून राहिली होती. त्यावर उपाय म्हणून तिला मेंदी काढण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. विवाह समारंभात मेंदी काढून मिळालेली पहिली कमाई जेव्हा तिने आईच्या हाती ठेवली, तेव्हा दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. तिच्याबरोबर मग दीपाली पाटीलही मेंदी काढायला शिकली. स्वत:च्या पायावर उभी राहिली. या मुली आपलं योगदान शाळेत मदत करून देत आहेत. भरत पाटील याला गॅरेजमध्ये पाठवून मोटरसायकल दुरुस्तीचं प्रशिक्षण दिलं व तो आज स्वत:ची कमाई करीत आहे. पाच मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन तयार झाल्यावर आता सर्वसामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आलं आहे. शाळेचा व्याप सांभाळतानाच मतिमंदत्वाच्या विषयावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी.ही पूर्ण केली. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ आणि अन्य संस्थांशी संलग्न असलेल्या डॉ. सुरेखा या व्याख्याने, प्रशिक्षण व पेपर तपासणी यातून स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी व चरितार्थासाठी कष्ट करीत आहेत.
गेल्या १० वर्षांतील संस्थेची ही वाटचाल सोपी नाही. अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. हाती घेतलेलं कार्य निर्धाराने पूर्ण करायचं आहे. कितीही संकटं आली तरी ईश्वरावरील अढळ श्रद्धा असल्याने तो कोणाच्या तरी रूपाने उभा राहून मदत करीत असतो, यावर ठाम विश्वास असल्याने त्यांची वाटचाल सुरू आहे. डॉ. पाटील यांना एका कटू प्रसंगामुळे पाच-सहा वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांसह रस्त्यावर येण्याची वेळ आली. पण न डगमगता आणि कार्यात कोणताही खंड पडू न देता त्या
उभ्याच राहिल्या. तेवढय़ाच जिद्दीने, खंबीरपणे
आणि आत्मविश्वासाने..मतिमंदाचं अंध:कारमय आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी एका पणतीप्रमाणे तेवत आहेत..
अध्यक्षा, सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, ता.पेण, जि.रायगड.

डॉ. सुरेखा पाटील
०२१४३-२५३०८५
०९८९२१९१९१८
http://www.suhitijeevan.org
suhitijeevantrust@gmail.org
loksattanavdurga@gmail.com