साक्री तालुक्यात देवकीनंदन डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खोत हे बुधवारी दुपारी पोलिसांना शरण आले. खोत यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होऊनही पोलीस त्यांना अटक करीत नसल्याचा आरोप फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांवर केला होता.
धुळे जिल्ह्य़ातील छाईल (ता. साक्री) येथे २००७ मध्ये खोत यांनी देवकीनंदन डेअरी स्थापन केली. तालुक्यातील शेकडो दूध उत्पादकांना डेअरीशी संलग्न करून घेतले. २००९-१० मध्ये डेअरीच्या दुधासाठी बळसाणे येथील ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या नावे कर्ज मंजूर करून दुभती जनावरे देण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु,धनादेशाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता दोंडाईचा येथील व्यावसायिक इस्माईल शेख यांच्या खात्यात वळविण्यात आली.
हा व्यवहार खोत, बँकेचे तत्कालीन अधिकारी सुभाषचंद्र विवरेकर यांच्या संगनमताने झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी पोलिसांकडे कैफियत मांडली. परंतु,त्यांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी दोन जून २०१३ रोजी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने जुलै २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. अनिल भामरे यांनी न्यायालयात फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यावर खोत यांनी धुळे जिल्हा सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सहा महिन्यानतर स्टेट बँकेचे विवरेकर यांना अटक केली. ते सध्या जामिनावर आहेत. तर, खोत व इस्माईल हे फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. खोत यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणारे बळसाणे येथील शेतकरी राजधर पाटील आणि इतर शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेत सांगलीत फिरणारे खोत पोलिसांना दिसत नाहीत काय, असा सवाल केला होता. खोत यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता. त्यातच बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास साक्रीच्या पोलीस ठाण्यात खोत हे स्वत:हून उपस्थित झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. बी. घुमरे यांनी दिली.