12 December 2019

News Flash

रायगडात शेकापसाठी धोक्याची घंटा

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापने यंदा आपले उमेदवार उभे केले नाहीत.

हर्षद कशाळकर, अलिबाग

एकेकाळी विधानसभेच विरोधीपक्ष नेतेपद भूषविणारा शेतकरी कामगार पक्ष आता रायगड जिल्ह्य़ापुरता मर्यादित राहिला आहे. आता पक्षाचे रायगड जिल्ह्य़ातील अस्तित्वही धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना अलिबाग विधानसभा मतदारसंघ वगळता अपेक्षित मत पडलेली नाहीत. हीच परिस्थिती कायम राहिली तर तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापने यंदा आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्याऐवजी त्यांनी दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. मावळमधून पार्थ पवार आणि रायगडमधून सुनील तटकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले. दोन्ही मतदारसंघांत पक्षाची मोठी ताकद असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल अशी अपेक्षा होती. पण निवडणूक निकालानंतर तसे झाल्याचे दिसून येत नाही. कारण मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. तर रायगड मतदारसंघात पेण आणि अलिबाग या शेकापच्या बालेकिल्ल्यामध्ये अपेक्षित सुनील तटकरे यांना अपेक्षित माताधिक्य मिळाले नाही.

उत्तर रायगडातील अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांत शेकापची संघटनात्मक बांधणी आहे. याच संघटनात्मक बांधणीच्या जोरावर त्यांनी आजवर आपला जनाधार कायम राखला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून पनवेल, उरण आणि कर्जतमधील जनाधाराला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना ५४ हजार ६५८ मताधिक्य मिळाले. उरण मतदारसंघातही बारणे यांना २ हजार ८८८ मत जास्त पडली. तर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कर्जत मध्ये पार्थ पवार यांना जेमतेम १ हजार ८५० मतांची आघाडी मिळाली.

दुसरीकडे रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग आणि पेण मतदारसंघ हे शेकापचे गड मानले जातात. दोन्ही मतदारसंघात शेकापचे आमदार आहेत. पण तरीही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. पेण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांना १ हजार ३०७ मते अधिक पडली. अलिबागमधून सुनील तटकरे यांना १९ हजार ९६६ मताधिक्य मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र असल्याने या मतदारसंघातून तटकरे यांना अपेक्षित असणारे तीस ते चाळीस हजारांचे मताधिक्य मिळू शकले नाही. तटकरे यांच्या रोहा तालुक्याने दोन्ही मतदारसंघात अपेक्षित मदत केली नसती तर दोन्ही मतदारसंघांतील परिस्थिती अधिकच बिकट झाली असती.

अलिबाग मतदारसंघ सोडला तर शेकापने पाठिंबा दिलेल्या एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे तटकरे आणि पार्थ यांना पडलेल्या मतांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मतांचाही समावेश होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पारंपरिक विरोधीपक्ष असणाऱ्या शेकापला काँग्रेसने मदत केली नाही तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

या निकालातून शेकापने बोध घेण गरजेचे आहे. जिल्ह्य़ात शिवसेना आणि भाजपचा वाढता प्रभाव हा त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. पक्षाचा सातत्याने घटणारा जनाधार ही धोक्याची सूचना आहे. मतदारांना गृहीत धरण्याची चूक केली तर त्याचे मोठे परिणाम शेकापला आगामी निवडणुकीत भोगावे लागू शकतात यात शंका नाही.

आघाडीला कार्यकर्त्यांचा विरोध?

आजवर जिल्ह्य़ात कधी शिवसेनेच्या मदतीने तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने वाटचाल सुरू ठेवली आहे. पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाडय़ा करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. आता अलिबाग आणि पेण मतदारसंघांत काँग्रेसशी जुळवून घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे, पण पारंपरिक विरोधी पक्ष असणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या आघाडीला कार्यकर्त्यांचा विरोध आहे. लोकसभा निवडणूक निकलातून दिसून येत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ

अलिबाग             पेण

शिवसेना भाजप युती                        ७९४९७              ९०५८८

शेकाप, काँग्रेस राष्ट्रवादी, आघाडी      ९९४६३              ८९२८१

 

मावळ लोकसभा मतदारसंघ

पनवेल           उरण            कर्जत

शिवसेना भाजप युती                       १६०३८५         ८९५८७       ८३९९६

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी   १०५७२७         ८६६९९          ८५८४६

First Published on June 20, 2019 4:39 am

Web Title: shetkari kamgar paksh now limited to raigad district
Just Now!
X