|| हर्षद कशाळकर

रायगड जिल्हा हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्य़ातून शेकापचा एकही सदस्य निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षावर ही परिस्थिती ओढवली. स्थानिक प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि मतदारांना गृहीत धरण्याची चूक शेकापला भोवली.

पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी या जोरावर शेतकरी कामगार पक्षाने काही अपवाद सोडले तर जवळपास सहा दशके जिल्ह्य़ाच्या राजकारणावर आपले वर्चस्व कायम राखले. आता मात्र शेकापच्या बालेकिल्ल्याचे एक एक बुरूज ढासळायला लागले आहेत. २००९ मध्ये पनवेलचा पारंपरिक मतदारसंघ शेकापने गमावला आणि यानंतर वर्चस्वाला धक्के बसण्यास सुरुवात झाली, २०१४ मध्ये उरण मतदारसंघ शेकापने गमावला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग आणि पेणसारखे पारंपरिक मतदारसंघ शेकापला राखता आले नाहीत. विधानसभा निवडणुकीत पक्षाची ही खराब कामगिरी ठरली. धैर्यशील पाटील, सुभाष पाटील आणि विवेक पाटील यांच्यासारख्या मातबर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा मध्यवर्ती बँक, शैक्षणिक संस्था, जिल्हा नियोजन समिती यावर शेकापचे वर्चस्व असूनही पक्षाला यंदा मतदारांवर प्रभाव पाडता आला नाही. मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष, मतदारांमधील सार्वत्रिक नाराजी यास कारणीभूत ठरली. त्यामुळे शेकापने या पराभवातून बोध घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्य़ात काँग्रेस आणि शेकापचा प्रभाव कमी होत असताना शिवसेना आणि भाजपची वाढ होत आहे. शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार यंदा निवडून आले आहेत. अलिबागमध्ये शिवसेना, तर पेण, उरण आणि पनवेलमध्ये भाजपने शेकापसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

जिल्हा परिषदेत वर्चस्व आवश्यक

रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. बदलत्या राजकीय समीकरणात ही सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान शेकापसमोर असणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. शेकापच्या पदीबाई ठाकरे, योगिता पारधी, शिवसेनेच्या सहारा कोळंबे, काँग्रेसच्या अनुसया पादीर या चार महिला अध्यक्षपदाच्या दावेदार असणार आहेत. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर शेकापचे २३, राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे १७, भाजपचे ३ तर काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीचा जिल्हा परिषदेच्या आघाडीवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी शेकापला घ्यावी लागणार आहे.