रायगड जिल्हा परिषदेवर आपलीच सत्ता कायम राहण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने नवीन राजकीय समीकरणे जिल्ह्य़ामध्ये आखल्याची माहिती हाती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळावर आपली टिकटिक वाजविण्यापेक्षा शेकापने आपल्या जुन्याच मैत्रीला साद घालून पुन्हा सुरात सूर जुळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी रायगडमधील शिवसेना आणि शेकापच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून लोकसत्ताला मिळाली आहे. त्यामुळे २१ तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मैत्रीचा करिष्मा शेकापला तारतो की राष्ट्रवादीच्या घडय़ाळ्याची टिकटिकवर शेकापची भविष्याचे ठोके वाजणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांचा विचार सुरू केल्यापासून जिल्ह्य़ातील ृसमीकरणे बदललेली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदारसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेकापला छुपी मदत करणार अशी चर्चा आहे.
दरम्यान, पनवेलमध्ये ठाकूर यांच्या भावी वाटचालीला शह देण्यासाठी शेकापने नवी व्यूहरचना आखल्याचे शेकापच्या एका नेत्याने आपले नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.