परीक्षा व तापमान वाढीचा फटका बसण्याची शक्यता

प्रशांत देशमुख, लोकसत्ता 

वर्धा : निधीची भरीव तरतूद करीत नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला ‘शिक्षणोत्सव’ उपक्रम ऐन उन्हाळ्यात आयोजित केल्याने त्याच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षणोत्सव उपक्रमाची घोषणा केली आहे. राज्यभरातील  शिक्षक मुलांची गुणवत्ता वाढावी म्हणून नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्राचा उपयोग करू लागले आहेत. सोबतच  आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्याने शाळा कात टाकत असल्याचे शैक्षणिक परिषदेचे निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणोत्सव उपक्रमाची संकल्पना समोर आली. शिक्षण प्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम आहे. प्राप्त माहितीनूसार, तीन वर्षांपूर्वी असा उपक्रम अंमलात आला होता. मात्र पुरेसा निधी नसल्याने तो बंद पडला.

आता या उपक्रमात स्टॉल लावणाऱ्या सगळय़ांना प्रवासखर्च, भोजन, सजावट आदीसाठी खास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक व शाळा व्यवस्थापन समितीसुद्धा उपक्रमाचा एक भाग आहे. १६ मार्चपर्यंत तालुकास्तरावर विषय सूचीनुसार २५ ते ३० स्टॉल निवडले जातील. प्रती तालुका ५० हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय शिक्षणोत्सवासाठी प्रत्येक तालुक्यातून पाच स्टॉलची निवड होईल. २० मार्चपूर्वी दोन दिवसीय जिल्हास्तरीय शिक्षणोत्सव आयोजित करायचा आहे. या पातळीवर ५० स्टॉलसाठी तीन लाख रुपये देण्यात येत आहेत. या उपक्रमाची जबाबदारी जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राज्यस्तरावर एकूण पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ३६ जिल्हय़ांसाठी ३ कोटी १६ लाख रुपयाची तरतूद उपलब्ध होणार आहे.

प्रतिसादाबाबत शंका

राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेश सरचिटणीस विजय कोंबे यांनी  यावेळी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र ऐन परीक्षेच्या दिवसात व तापमान वाढत असताना उपक्रमाच्या प्रतिसादाबाबत शंका व्यक्त केली. हा उपक्रम नव्याने सुरू करताना वेळकाळाचा विचार करणे आवश्यक होते. हिवाळय़ात आयोजन झाले असते तर सहभाग मोठय़ा प्रमाणात लाभला असता. आताच काही शाळांचे वार्षिक संमेलन आटोपले आहे. शिक्षणोत्सव उपक्रमास कसा प्रतिसाद मिळेल, हे सांगता येत नाही. आयोजक व शैक्षणिक परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.