साईभक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मृत्युपश्चात नेत्रदानाचा संकल्प करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले. मृत्यूनंतरही आपले डोळे हे जग पाहू शकतील आणि एका अंध व्यक्तीला ही सृष्टी पाहण्यासाठी दृष्टी मिळेल असे सांगत समाजासाठी मी काहीतरी करीत आहे याचा मनस्वी आनंद होतो, अशी भावना शिल्पाने आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आज पती राज कुंद्रा यांच्यासोबत साईबाबांचे दर्शन घेतले. शिल्पाची धाकटी बहीण शमिता शेट्टीने नुकताच नेत्रदानाचा संकल्प केला. शमिताची स्तुती करून शिल्पानेही नेत्रदान करण्याचा संकल्प केला. नुसती इच्छाच व्यक्त न करता शिल्पाने सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा मृत्युपश्चात नेत्रदानाचा अर्ज भरून आपला इरादा पक्का असल्याचे दाखवून दिले.
शिल्पा म्हणाली, माझे संपूर्ण कुटुंब साईभक्त आहे. मी गेल्या १२ वर्षांपासून गुरुवारचा उपवास करते. त्यात आज गुरुवारीच साईबाबांचे दर्शन झाले. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर आज शिर्डीला येणे शक्य झाले असे तिने सांगितले. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाची सहमालकीण असलेल्या शिल्पाने संघ पराभूत झाल्याचे शल्य व्यक्त करताना, क्रिकेटमध्ये जय-पराजय होतच असतो. राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी या मालिकेत चांगली होती. पणजिंकू शकलो नाही हा प्रश्न विचारून दु:खी करू नका. मी विसरण्याचा प्रयत्न करते. आयपीएलमध्ये काहीही शक्य आहे, असे सांगत शिल्पाने या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्याचा आनंद आहे. लगेच सगळं ठीक होईल असं नाही. त्यांनाही कामासाठी वेळ द्यायला हवा. मोदी सरकारने महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे अशी इच्छा शिल्पाने या वेळी बोलून दाखवली. शिल्पा शेट्टीला बघण्यासाठी, तिची स्वाक्षरी व तिच्या सोबत छायाचित्र काढण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. शिल्पानेही आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही.