सोलापूर शहराच्या काँग्रेसअंतर्गत राजकारणात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व विष्णुपंत कोठे यांच्यातील शीतयुध्दाला तोंड फुटल्यानंतर कोठे गटाची अडचण झाल्यामुळे अखेर उभय गटात पुन्हा दिलजमाई झाली आहे. त्यामुळे महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांच्या विरोधात प्रदेश पक्षश्रेष्ठींनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस व त्यास प्रतिज्ञापत्राद्वारे कोठे यांनी पक्ष शिस्तभंग केला नाही व करणार नसल्याची दिलेली हमी पाहता त्यांच्याविरोधातील कारवाई मागे घेतली जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यात शिंदे यांनी बाजी मारल्याचे तर कोठे यांची हार झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
स्थानिक राजकारणात शिंदे व कोठे यांच्यातील शीतयुध्द अनेक दिवसांपासून सुरू असून यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या दारूण पराभवानंतर कोठे गटाने पुन्हा उचल खाल्ली होती. कोठे गटाच्या दबावामुळे महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याचे मानले जात असले तरी त्यावर समाधान न मानता पालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी आपले वडील विष्णुपंत कोठे यांची विधान परिषदेवर वर्णी न लागल्याचा मुद्दा उकरून काढत दबावाचे राजकारण सुरू केले होते. मागील विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली असता त्यांचा पराभव घडवून आणला होता. या पाश्र्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी सोलापूर शहर उत्तरऐवजी शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास अन्य कोणत्याही पक्षाची उमेदवार घेऊन ही जागा लढविण्याचा मनोदय कोठे यांनी स्पष्टपणे बोलून दाखविला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेना व भाजपबरोबर संपर्क ठेवला होता. ही बाब त्यांनी मान्यही केली होती.
शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असताना कोठे यांचा सेनेच्या वरिष्ठ सूत्रांशी संपर्क होऊन त्यात महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्याची कामगिरी कोठे यांच्यावर सोपविण्यात आली होती. इकडे काँग्रेस पक्षात शिंदे गटाने सावध पवित्रा घेत पक्षातून कोठे यांच्यासोबत कोणीही नगरसेवक शिवसेनेत जाणार नाही, याची दक्षता घेतली व त्यास बऱ्यापैकी यश आले. याच कालावधीत सुशीलकुमार शिंदे हे तीन दिवस सोलापुरात ठाण मांडून होते.
त्यामुळे कोठे यांचा डाव एकीकडे फसला असताना दुसरीकडे प्रदेश श्रेष्ठींकडून महेश कोठे यांच्यावर पक्षशिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली. शिंदे गटाने कोठे यांना दिलेला हा प्रतिशह होता. या राजकारणात महेश कोठे यांचे वडील विष्णुपंत कोठे हे कोठेही प्रकाशात आले नाहीत. पक्षश्रेष्ठींच्या नोटिशीला उत्तर देताना महेश कोठे यांनी पक्षावरील अखंड निष्ठा प्रकट करीत सत्य प्रतिज्ञापत्र पाठविले आहे. आता कोठे हे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे नाव घ्यायला तयार नाहीत, तर पूर्वीच्या शहर उत्तर विधानसभेच्या जागेवरील दावा त्यांनी केला आहे. यात शिंदे यांची जीत तर कोठे यांची हार झाल्याचे मानले जाते.