यूपीएससी परीक्षेत जिल्हय़ातील सहा विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवून लातूर पॅटर्न गाजवला.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील राघवेंद्र प्रकाशराव चांबोळकर कुलकर्णी याने देशपातळीवर १३०वा क्रमांक पटकावला. राघवेंद्रचे शालेय व माध्यमिक शिक्षण औराद शहाजनी येथील महाराष्ट्र विद्यालयात झाले. अकरावी-बारावीचे शिक्षण दयानंदमध्ये, तर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातून दंतचिकित्सकाची पदवी घेतली. राघवेंद्रचे वडील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आहेत. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच जि. प.चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम, नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्याशी संपर्क आला. त्यातून या क्षेत्रात पदार्पणाची भावना राघवेंद्रच्या मनात निर्माण झाली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. ‘लोकसत्ता’शी बोलताना राघवेंद्र म्हणाला की, आयएएसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील चित्र पालटण्यासाठी योगदान देण्याचे आपले स्वप्न आहे. परीक्षेतील यशाने पहिला टप्पा आपण गाठला. पुढचे टप्पे आव्हानात्मक असल्याचे तो म्हणाला.
लातूरच्या हृषीकेश मल्लिकार्जुन कोटगे याने ५५५वा रँक मिळविला. देशीकेंद्र विद्यालयात त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. निलंगा येथील डॉ. राहुल जोळदापके याने ३३९ रँकसह यश साजरे केले. गतवर्षी ५३०वा रँक घेऊन तो उत्तीर्ण झाला होता. आयएएस व्हायचे असल्यामुळे त्याने पुन्हा परीक्षा दिली. त्याचे शालेय शिक्षण निलंग्याच्या शिवाजी विद्यालयात झाले. अकरावी-बारावी शाहू महाविद्यालय, तर एमबीबीएसची पदवी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळविली. लातूर तालुक्यातील बोपला गावातील आशिष अविनाश काटे याने ६९१वा रँक घेऊन परीक्षेत यश मिळविले. उदगीर येथील भाग्यश्री बाबुराव नवटक्के हिने १२५वा रँक घेऊन परीक्षेत यश मिळविले. तिसऱ्या प्रयत्नात तिने हे दिमाखदार यश साजरे केले.
यूपीएससीतील यशाने अनिकेतची स्वप्नपूर्ती!
प्रतिनिधी, औरंगाबाद
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीला साजेसे यश औरंगाबादकर अनिकेत पाटणकर याने यूपीएससी परीक्षेत साजरे केले. या यशामुळे अनिकेतचे भारतीय परराष्ट्र सेवेत जाण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या दोन्हींमध्ये मिळून सर्वसाधारण वर्गामध्ये एकूण १०६ जागा उपलब्ध असतात. अनिकेतने गुणवत्ता यादीमध्ये देशात ९२ वा क्रमांक प्राप्त केल्यामुळे आपले स्वप्न आता टप्प्यात आल्याची प्रतिक्रिया त्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
एशियन पेंट्समध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अनिकेतची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात केवळ काही गुणांमुळे माघार घ्यावी लागली. मात्र, त्यामुळेच दुसऱ्या प्रयत्नात अधिक जोर लावून मेहनत घेतली. साहजिकच अपेक्षित यश साजरे करता आल्याचे व त्यामुळेच स्वप्नपूर्तीचे ध्येय साध्य होणार असल्याचे अनिकेतने सांगितले. भारतीय प्रशासकीय व परराष्ट्र सेवेत मराठी झेंडा झळकण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या क्षेत्रात कारकीर्द घडविण्याचे स्वप्न मनात बाळगून अनेक तरुण झटून प्रयत्न करतात. परराष्ट्र सेवेत जाण्याची माझी पूर्वीपासूनच इच्छा होती. परीक्षेचा अर्ज भरतानाही प्राधान्यक्रमात याचाच उल्लेख केला होता. परीक्षेत अपेक्षित यश मिळाल्याने स्वप्नपूर्तीचा क्षण व आनंद साजरा करता येणार आहे, अशी प्रतिक्रिया अनिकेतने या यशावर बोलताना व्यक्त केली. या परीक्षेत संदीप घुगे (१०५), परभणी जिल्ह्य़ातील अरविंद रेंगे (६४७) व आशिष काटे (६९१) यांनीही या परीक्षेत उल्लेखनीय यश साजरे करताना मराठवाडय़ाची पताका फडकवली.