वसई नायगाव – भाईंदर खाडी पुलाच्या खालून जाणाऱ्या  मोठ्या बाजची  ( जहाज) उड्डाणपुलाला धडक लागल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामध्ये पुलाचे नुकसान झाले आहे.

घोडबंदर येथून बाज लक्षद्वीप येथे जाणार होते. त्यासाठी वसई येथे सामान भरण्यासाठी हे बाज शुक्रवारी  मध्यरात्री नायगाव येथील खाडीच्या मार्गे निघाले होते.  सुरवातीला समुद्राला ओहोटी होती. मात्र भरती येताच हे बाजवरती आले.  त्यामुळे याची धडक रेल्वे उड्डाण पुलाला लागली त्यामुळे त्यावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काही प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच त्यानंतर हे बाज पाण्यात बुडवून बाज बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु बाज बाहेर निघू शकत नसल्याने त्या ठिकाणाहून बाज मध्ये असलेले चालकांनी पळ काढला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी शासकीय मालमत्तेचे म्हणजेच पुलाचे नुकसान केले म्हणून बाज चे चालक आणि मालक यांच्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच यामध्ये रेल्वे अधिनियमाचे कलम आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे.