कोकणाकरिता आवश्यक असणारे जहाज उद्योगातील काही अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता यश फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. केवळ पदवी घेऊन नोकरीसाठी फिरत राहण्यापेक्षा कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे येथील विद्यार्थ्यांना सहज रोजगार मिळेल. त्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. तसेच फाऊंडेशनच्या नर्सिग कॉलेजचे नामकरण मातोश्री स्व. शकुंतला यशवंत माने कॉलेज असे करण्यात येईल, अशी घोषणा व्यवस्थापकीय विश्वस्त व माजी आमदार बाळ माने यांनी केली. वडील स्व. यशवंतराव माने यांच्या तिसाव्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. एमआयडीसी विमानतळ परिसरातील नर्सिग कॉलेजमध्ये शनिवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने, मिहीर माने, विराज माने, प्राचार्य दीपा जे. निवळी येथील माने विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाचकुडे व यशवंत माने प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक घवाळी, पंचायत समितीचे उपसभापती योगेश पाटील उपस्थित होते.
पाचकुडे व घवाळी यांनी यशवंतराव माने यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. तसेच बाळ माने यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. माने म्हणाले की, ‘युवा पिढी स्वत:च्या पायावर उभी राहण्याकरिता या अभ्यासक्रमाची कोकणाला गरज होती. भविष्यात शिपिंग इंडस्ट्रीमधील काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून र्मचट नेव्ही व डी. जी. शिपिंगमध्ये युवकांना नोकऱ्या मिळतील. नर्सिग कॉलेजची संकल्पना सुचली आणि कोकणात कॉलेज सुरू केले. ’
प्राजक्ता राटुळ आणि ममता विचारे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम मयेकर, ग्रंथपाल मानसी मुळे, गुरू शिवलकर, चेतन अंबुजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.