अलिबाग जवळील रेवदंडा येथील अडकून पडलेल्या मालवाहू जहाजेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे खडकावर आदळून हे जहाज कोर्लई किल्ल्याजवळील समुद्रात अडकून पडले आहे. अडीच हजार टन कच्चे लोखंड असणाऱ्या या जहाजाला टग बोटच्या मदतीने रेवंदडा बंदरात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. अलिबाग व मुरूड तालुक्‍याच्‍या सीमारेषेवर असलेल्‍या साळाव येथे  जेएसडब्‍ल्‍यू कंपनी आहे. या कंपनीसाठी लागणारा कच्‍चा माल हा समुद्रमार्गे येत असतो व तो जहाजाने रेवदंडा बंदरात आणला जातो.  ‘एम व्‍ही कुमार मुंबई २५६३’  नावाच्या या जहाजात अडीच हजार टन कच्‍चे लोखंड रेवंदडा बंदराच्या दिशेने आणले जात होते. मात्र वादळी वाऱ्यामुळे जेटटीपासून काही अंतरावर असलेल्या कोर्लई किल्‍ल्‍याच्‍या जवळ हे जहाज भरकटले, आणि खडकावर आदळून वाळूत रुतून बसले. वादळी वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे जहाज कलंडण्यास सुरवात झाली. यानंतर याबाबतची सुचना तटरक्षक दल आणि मेरीटाईम बोर्डाला देण्यात आली. तटरक्षक दलाने या जहाजाची पहाणी केली असून सर्व खलाशी सुखरुप असल्याची माहिती दिली आहे.  जहाज बाहेर काढण्यासाठी मुंबई बंदरातून टग बोट मागवण्यात आली आहे. या टगबोटच्या साह्याने अडकलेल्या जहाजेला रेवदंडा बंदरात आणले जाणार आहे. समुद्र खवळलेला असल्याने या कामात अडचणी येत आहेत.