सीताराम चांडे, लोकसत्ता

राहाता (जि. अहमदनगर) : सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याचा प्रचार काही लोकांनी सुरू केल्याने वादाला तोंड फुटले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी रविवार पासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे.

साईबाबा नेमके कोण होते, याबद्दल अनेकांचे दावे आहेत. ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. १९७५ मध्ये विश्वास खेर यांनी तसा दावा केला. काहींनी बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् येथे झाला, त्यांच्या आईचे नाव वैष्णवी तर वडिलांचे नाव अब्दुल सत्तार असल्याचे सांगितले. एका तामीळ चरित्रात त्यांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख आहे.

गुजराथी ‘साईसुधाम’ध्ये बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. मंगळवेढय़ात एक वेडसर बुवा होते. तेच साईबाबा असल्याची चर्चा होती. काहींना १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे हे साईबाबा असल्याचा संशय होता. तसे लेखही छापून आले. मात्र हे सर्व दावे तर्कावर आधारीत आहेत.

शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन शिष्टमंडळ त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडणार आहे.

साईभक्तांची पाथरीला मान्यता नाही

साईबाबांनी १९१८ मध्ये समाधी घेतली. दाभोळकर, चांदोरकर, दीक्षित या परंपरागत त्यांच्या भक्तांनी नंतर शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केले. बाबांच्या समाधी सोहळ्याला पाथरी येथील भुसारी घराण्यातील अथवा गावातील कुणीही शिर्डीला आले नाही. बाबांच्या हयातीतील एकही भक्त पाथरीचा नव्हता. बाबांच्या हयातीतील भक्तांचा विश्वस्त मंडळात समावेश होता. त्यातही पाथरीकर सापडले नाहीत. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. खेर यांनी पुढाकार घेऊन पाथरीत मंदिर बांधले. विश्वस्त मंडळ स्थापन केले. मात्र त्याला साईभक्तांनी मान्यता दिली नाही. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

साईबाबांची जन्मभूमी ही पाथरी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी पाथरीला भेट दिली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विकास आराखडा मंजूर केला. शिर्डीकरांचा त्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचे पुरावे शिर्डीकरांनी उपलब्ध करुन द्यावेत.

– बाबाजानी दुर्रानी, आमदार

पाथरीचा काय विकास करायचा असेल तो करावा. पण मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळ म्हणून पाथरीचा उल्लेख करु नये. साईचरित्रात जन्मस्थळाचा उल्लेख नाही.

-कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

साईभक्तांमध्ये गैरसमज निर्माण करुन वाद निर्माण करण्याचे काही लोकांचे षङ्यंत्र आहे. राष्ट्रपती व मुख्यमंत्र्याना चुकीची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांना वेळ दिला आहे. लवकरच शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. पंधरा दिवसात बैठक होऊन त्यावर तोडगा निघेल.

– कमलाकर कोते, शिवसेना नेते, शिर्डी.

पाथरीच्या विकासाकरिता निधी मिळावा म्हणून जन्मस्थानाचा अपप्रचार सुरु आहे. साईबाबांच्या चरित्रात पाथरीचा उल्लेखच नाही. प्रत्यक्ष कुठलेही पुरावे नाहीत. बाबांनी कुणालाही गादीवर बसविलेले नाही. संस्थानकडे असलेल्या कागदपत्रावरुन बाबांचे जन्मस्थळ निश्चित होत नाही. यापूर्वीच हे प्रकरण संस्थानने गांभीर्याने घ्यायला हवे होते. बाबांना त्यांच्याबद्दल विचारलेले आवडत नव्हते. ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे वागावे, अशी शिकवण ते देत. साईबाबा संस्थानने याचा सोक्षमोक्ष लावायला हवा.

-सुभाष उर्फ बाबा जगताप, माजी प्रशासकीय अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी