मोहनीराज लहाडे

शिर्डीमध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढते आहे. शिर्डीला दरवर्षी किमान अडीच कोटी भाविक भेट देतात. भाविकांनी आसपासच्या पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात म्हणून पोलिसांनी पर्यटन पोलीस मदत केंद्र ही नवीन संकल्पना राबविली आहे. पर्यटकांना मदत करणारा पोलीस असा हा राज्यातील पहिलाच उपक्रम शिर्डीत सुरू करण्यात आला आहे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा व सुविधामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण व मार्गदर्शन करण्यासाठी जलद पोलीस सेवा उपलब्ध व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिर्डीला भेट दिली होती. साईबाबा मंदिर परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेताना मंदिरालगत एक पर्यटन पोलीस मदत केंद्र असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या केंद्रासाठी पुढाकार घेतला. ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्याशी संपर्क करून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने मदत केली आहे.

मंदिरालगतच अभियंत्यांमार्फत उत्तम डिझाईन करून तयार केलेले कायमस्वरूपी, सुसज्ज अशा पोलीस मदत केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. ‘श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्र’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या केंद्रात एक सहायक निरीक्षक व दहा पोलीस तैनात करण्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे ‘हॉस्पिटॅलिटी’ व इतर ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण या केंद्रातील पोलिसांबरोबरच शिर्डी पोलीस ठाण्यातील सर्वच म्हणजे १४० पोलिसांना देण्यात आले आहे. शिर्डीमध्ये देशातील सर्व राज्यांसह विविध देशांतील भाविक भेटी देत असतात. त्या दृष्टीने विविध भाषा अवगत असणारे पोलीस तेथे नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शिर्डीत साईदर्शनानंतर करायचे काय, असा प्रश्न भाविकांचा पुढे असतो. नगर किंवा लगतच्या जिल्ह्य़ातील मनोरंजन किंवा पर्यटन स्थळांबाबत, तेथे जाण्यासाठी-राहण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत याची त्यांना फारशी माहिती नसते. या भाविकांना पर्यटनाचे जर व्यवस्थित मार्गदर्शन झाले, माहिती मिळाली तर हेच पर्यटक नगर जिल्ह्य़ातील इतर स्थळांना भेटी देतील, शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये दहा टक्के भाविकांनी जरी या पर्यटनाचा लाभ घेतला तरी जिल्ह्य़ात रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण होऊ शकतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुविधा अनेक ठिकाणी आहेत, त्याची माहिती पर्यटकांना होऊ शकते.

परदेशातून, परराज्यातून येणाऱ्या अमराठी भाषिकांत समन्वय ठेवण्यासाठी शिर्डीमध्ये स्थायिक असलेल्या विविध भाषिक लोकांची यादी करून त्यांच्या मदतीने साईभक्तांच्या तक्रारींचे निरसन करण्याचा उपक्रमही आगामी काळात राबवला जाणार आहे. या पोलीस मदत केंद्रात आता लवकरच एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातील पर्यटन संदर्भात माहिती देणारे साहित्य उपलब्ध केले जाईल. पर्यटनवाढीसाठी या पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन, शिर्डी संस्थान, शिर्डी पालिका, एमटीडीसी, आरटीओ अशा विविध यंत्रणांना एकत्र आणण्याचे कामही होणार आहे.

श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून शिर्डीतील सुरक्षेबरोबरच पर्यटनवाढीसाठी मदत होणार आहे. त्याचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी होणार आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांना परिसरातील, जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांची, सुविधांची योग्य माहिती मिळणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळतील. पर्यटकांसाठी या मदत केंद्रामार्फत काही उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने इतरही उपक्रम राबवले जाणार आहेत. केवळ मदत केंद्रातील पोलिसांनाच नव्हे तर शिर्डीतील सर्व १४० पोलिसांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. – मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर

पर्यटनाच्या दृष्टीने पोलिसांना हॉस्पिटॅलिटी आणि इतर सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने शिर्डीमध्ये प्रथमच राबवला आहे. त्यामुळे पर्यटनदृष्टय़ा पोलीस प्रशिक्षित झाले आहेत. याचा उपयोग पर्यटनवाढीबरोबरच भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून शिर्डीची प्रतिमा उंचावण्यासाठी या मदत केंद्राचा उपयोग होईल. महामंडळाला पर्यटनासाठी पोलिसांची मदत मिळत असतेच, परंतु त्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याचा उपक्रम मात्र प्रथमच राबवला गेला आहे.

– चंद्रशेखर जयस्वाल, उपमहाव्यवस्थापक, एमटीडीसी, मुंबई.