शिर्डीमधील साईबाबा मंदिरात देणगीच्या स्वरुपात जमा होणारी नाणी स्वीकारा असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राष्ट्रीयकृत बँकांना दिला आहे. मुंबईत बेलापूर येथे सर्व बँकांच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी रिझर्व्ह बँकेने शिर्डी साईबाबा मंदिरातील नाणी स्वीकारा असा आदेश दिला. साई संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संस्‍थानचे मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडेदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते.

दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, ‘जागेसंदर्भात काही अडचण असल्‍यास बँकांनी साई संस्‍थानकडे जागा उपलब्‍ध आहे का याची चाचपणी करावी. साई संस्‍थानाने तशी तयारी दर्शविलेली आहे. संस्‍थान व बँका संयुक्‍तरित्‍या जागेची पाहणी करतील. बँकांना जागा पसंत पडल्यास ती नाणी बँकांच्‍या ताब्यात राहतील. संस्‍थान त्‍या ठिकाणी सीसीटीव्‍ही व सुरक्षा उपलब्‍ध करुन देईल. जमा होणाऱ्या नाण्यांवरील जे व्‍याज असेल ते व्‍याज बँका संस्‍थानला नियमितपणे देईल’, अशी सूचना रिझर्व बॅंकेचे जनरल मॅनेजर के. कमला कन्‍नन यांनी दिली आहे.

याआधी बँकांनी साई मंदिरातील दानपेटीत जमा होणारी नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. नाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की, ती ठेवण्यास जागाच उपलब्ध नसल्याचं कारण बँकांनी दिलं होतं. यामुळे साई संस्थानासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. यानंतर रिझर्व्ह बँकेने ही नाणी स्वीकारण्याचा आदेश बँकांना दिला आहे.