शिर्डी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत अखेर वादावर पडदा पडला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचं वक्तव्य मागे घेतलं. तसंच पाथरीचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून करणार असं आश्वासन दिल्यानंतर शिर्डीकरांनी आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांचा जन्म पाथरी या ठिकाणी झाला हे वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. आज अखेर त्या वादावर पडदा पडला आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सगळ्या मागण्या ऐकल्या तसंच त्या मान्यही केल्या. त्यांच्या आश्वासनानंतर शिर्डीकर समाधानी आहेत. आता नवा कोणताही वाद निर्माण होणार नाही” असंही आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं असल्याचं शिर्डी संस्थानचे कमलाकर कोठे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे. त्या अनुषंगाने पाथरीचा विकास करण्यात येईल. पाथरी गावासाठी १०० कोटींचा विकास आराखडा तयार असल्याचं वक्तव्यही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ज्यानंतर वाद निर्माण झाला होता. शिर्डीमध्ये या वक्तव्याविरोधात पडसाद उमटले. रविवारी शिर्डी बंदचीही हाक देण्यात आली. त्यानंतर आज शिर्डीच्या ग्रामस्थांचं शिष्टमंडळ, पाथरीमधील गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.