करोना संकटामुळे गेले दोन महिने सुरू असलेल्या टाळेबंदीचा पवित्र रमजान सणावर परिणाम झाला. शहरातील हातगाडीवर काम करणारे, रिक्षा चालक, मोलकरणीचे काम करणाऱ्या महिला, दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या घरीही रमजानच्या सणाला गोडधोड मिळावे यासाठी मिरजेत तब्बल साडेतीन हजार  लिटर दुधाचा वापर करून शिरकुर्मा करण्यात आला. रविवारी पहाटेपासून चुलवानावर ही खीर शिजत होती. आज त्याचे मंडळाच्या शंभरहून कार्यकर्त्यांनी ३ हजार ६४५ कुटुंबांना वाटप केले.

टाळेबंदी लागू झाल्यापासून हातावर पोट असणारे, परप्रांतिय कामगार, विद्यार्थी यांची आबाळ होत होती. शकिल पिरजादे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या हयात फौंडेशनने गेले ६४ दिवस या लोकांच्या तोंडी चार घास नियमित पडतील याची खबरदारी घेतली होती. काही जणांचा रोजाही या कालावधीत होता. या सर्वाना सणाचे गोडधोड मिळावे यासाठी मंडळाचे कार्यकत्रे रविवारी रात्रीपासून झटत होते.

मंडळाचे अध्यक्ष पिरजादे यांच्याबरोबर शमशुद्दीन शेख, नईम सलाती, अमिन जातकर, डॉ. सलिम चमनशेख, तन्वीर बागवान, मौलाना मुबारक, मोहसीन खानापुरे, मुसा समडोळे, युनिस चाबुकस्वार आदी कार्यकत्रे यासाठी रात्रभर खीर तयार करण्याच्या कामात गुंतले होते.

दरम्यान, सांगली व मिरज शहरात सोमवारी रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज आपल्या राहत्या घरीच अदा केली. या करोनातून मानव जातीचे संरक्षण कर अशी अल्लाकडे दुवा मागितली.

घरटी तीन लिटर खीर

मिरजेच्या शास्त्री चौकामध्ये या गरीब, गरजू लोकांसाठी शीरकुर्मा करण्यात आला होता. यासाठी तब्बल साडेतीन हजार लिटर दूध, पाच क्विंटल साखर, ७५ किलो शेवया, २२ किलो काजू, बदाम आणि पिस्ता प्रत्येकी २० किलो, ३० किलो खवा, १ किलो वेलची, ३ किलो चारोळी आवश्यकतेनुसार केसर आणि जायफळ यांचा वापर करून ही खीर तयार करण्यात आली. प्रत्येक घरटी तीन लिटर खीर पोहच करण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती.